नवी दिल्ली – नोकरी शोधणाऱ्या युवकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. नोकरी मिळवण्यासाठी सर्वात सोपा पर्याय म्हणजे तुम्ही तुमचा Resume नोकरी देणाऱ्या कंपनीच्या ई-मेल आयडी पाठवायचा आणि संबंधित व्यक्तीला संपर्क साधायचा. त्याशिवाय एखाद्या जॉब पोर्टलवर जात तुम्ही तुमचा बायोडेटा अपडेट करु शकता. परंतु नोकरी मिळवण्यासाठी एका व्यक्तीनं लढवलेली शक्कल पाहून तुम्हीही विचारात पडाल.
या व्यक्तीने एका पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या सर्व वाहनांवर त्याचा CV, Linkedin Profile सह चिटकवला. मजेशीर बाब म्हणजे त्याने केलेल्या या प्रकारामुळे त्याला मार्केटिंग एग्जिक्युटिव्ह नोकरीही मिळाली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्यक्तीने CV वर नाव, QR Code आणि linkedin Profile ची माहिती शेअर केली होती. काही तासांतच त्याला नोकरीसाठी कॉल आला.
पार्किंगमधील सर्व गाड्यांवर लावले स्टिकर्स
जोनाथन स्विफ्टने त्याचा सीवी असलेले स्टिकर्स बनवले होते. त्यानंतर पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या सर्व गाड्यांवर ते चिटकवले. त्याने लढवलेली ही शक्कल कामी आली. इन्स्टाप्रिंट यूकेमध्ये मार्केटिंग मॅनेजर क्रेग वासेलनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. क्रेगनं हे स्टिकर्स चिटकवलेल्या जोनाथन स्विफ्टला जॉब ऑफर दिली आहे. क्रेगनं जो व्हिडीओ पोस्ट केला त्यात म्हटलंय की, अनेकदा काही सोप्या गोष्टी फायदेशीर ठरतात. विशेष म्हणजे जोनाथने नोकरी मिळवण्यासाठी छापलेले स्टिकर्स इन्स्टाप्रिंट यूके येथूनच बनवले होते.
याबाबत इन्स्टाप्रिंटनं त्यांच्या ट्विटर हँडलवर माहिती शेअर केली आहे. पार्किंगमध्ये सर्व गाड्यांवर स्टिकर्स चिटकवले होते. हा प्रकार अनोखा आहे. एकूण मिळून जोनाथनं ५०० गाड्यांवर सीवी चिटकवला होता. क्रेग वासेलनं सांगितले की, एका सिक्युरिटीशी निगडीत काही लोकांनी युवकाच्या या करामतीबद्दल माहिती दिली. जेव्हा हा युवक गाड्यावर स्टिकर्स चिटकवत होता तेव्हा आमची त्याच्यावर नजर पडली. त्यानंतर जोनाथनला मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. मिररशी संवाद साधताना जोनाथन म्हणाला की, ही आयडीया त्याची नाही. एका व्यक्तीनं अशाप्रकारे कृत्य केल्याचं पाहिलं होतं. त्यानेही बॅनर प्रिंट केले होते. त्यावरुन मला ही कल्पना सुचली. त्यानंतर मी स्टिकर्स छापून ते गाड्यांवर दर्शनी भागात लावले.