जर तुम्हाला कुणी सांगितलं की दोन देशांची सीमारेषा त्याच्या घराच्या बेडरुममधून जाते तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. युरोपातील बार्ले शहरात अशी अनोखी जागा आहे जिथं तुम्ही एका देशात नाश्ता बनवू शकता तर तोच नाश्ता तुम्ही त्याचवेळी दुसऱ्या देशात जाऊन खाऊ शकता. तुम्ही तुमच्याच घरात एक पाऊल टाकलं की थेट दुसऱ्या देशात पोहोचू शकता.
बार्ले (Baarle) शहर हे नेदरलँड आणि बेल्जियम या दोन देशांच्या सीमेवर वसलं आहे. दोन्ही देशांची सीमारेषा येथील घरांच्या अगदी मधून जाते. त्यामुळेच येथील नागरिकांचं एक पाऊल नेदरलँडमध्ये तर एक पाऊल बेल्जियममध्ये ठेवता येतं. म्हणजेच बार्ले शहरातील नागरिक एका क्षणात दुसऱ्या देशात पोहोचू शकतात. कारण दोन्ही देशांची सीमा त्यांच्या राहत्या घरातून जाते. या शहरातील अनेक सामाजिक स्थळं, रेस्टॉरंट्स, कॅफे हाऊसचा अर्धा भाग नेदरलँड तर अर्धा भाग बेल्जियम देशाचा भाग आहे.
बार्ले शहराचा काही भूभाग नेदरलँड्सकडे आहे तर काही बेल्जियमकडे आहे. नेदरलँडच्या अखत्यारितील ठिकाणाला Baarle-Nassau असं नाव आहे. तर बेल्जियमच्या अखत्यारितील भूभागाला Baarle-Hertog असं म्हटलं जात आहे. दोन्ही देशांची सीमा रेषा देखील पांढऱ्या रंगानं निश्चित करण्यात आली आहे. येथील अनेक दुकानं, रेस्टॉरंट्स आणि घरांमध्येच सीमारेषा आखण्यात आली आहे. काही घरांच्या बेडरुममधूनच ही सीमारेषा जात आहे. म्हणजेच तुम्ही बेडवर झोपलेले असताना फक्त कूस बदलली की तुम्ही दुसऱ्या देशात पोहोचता. बार्ले शहराची जशी दोन नावं आहेत. तसंच इथं संस्था देखील दोन आहेत. नगरपालिका आणि पोस्ट ऑफिस देखील दोन आहेत. पण या सर्वांचं कंट्रोल एकाच समितीकडे आहे. याच अनोख्या मुद्द्यासाठी हे शहर नेहमीच चर्चेचा विषय ठरतं. जगभरातून अनेक पर्यटक ही अनोखी गोष्ट पाहण्यासाठी या शहराला भेट देतात आणि फोटो देखील टिपतात.