शाहजहांपूर: कोरोना संकटात सध्या सगळीकडेच प्रतिबंधात्मक नियम पाळून विवाह सोहळे संपन्न होत आहेत. अतिशय मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न संपन्न होत आहेत. महाराष्ट्रात सध्या केवळ २ तासांत लग्न उरकण्यात येत आहेत. अन्यथा पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. उत्तर प्रदेशमधल्या शाहजहांपूरमध्ये अवघ्या १७ मिनिटांत एक विवाह सोहळा संपन्न झाला. कोणत्याही बँड, बाजा, वरातीशिवाय हा विवाह सोहळा संपन्न झाला.उत्तर प्रदेशातल्या शाहजहांपूर इथे असलेल्या एका देव कली येथील शिव मंदिरात तरुण तरुणीनं अतिशय साधेपणानं लग्न केलं. सध्या हे लग्न परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. साधेपणानं आणि हुंड्याशिवाय लग्न होऊ शकतं याबद्दलचा संदेश देण्यासाठी पुष्पेंद्र दुबे यांनी अशाप्रकारे विवाह केला. पुष्पेंद्र दुबे सनाय गावचे रहिवासी असून ते शिक्षण संस्था चालवतात. त्यांचा विवाह हरदोईच्या प्रीति तिवारी यांच्याशी झाला.पुष्पेंद्र यांनी थाटामाटात लग्न करण्यास नकार दिला होता. लग्न साधेपणानं आणि हुंड्याशिवाय व्हावं असा त्यांचा आग्रह होता. सध्या परिसरात कर्फ्यू लागला असल्यानं पुष्पेंद्र गुरुवारी मोजक्या नातेवाईकांसह देव कली येथील शिव मंदिरात पोहोचले. तिथे विवाहाचे सर्व विधी अवघ्या १७ मिनिटांत पूर्ण झाले. पुष्पेंद्र यांचा हुंड्याला विरोध आहे. त्यामुळे त्यांनी मुलीच्या कुटुंबाकडून काहीच घेतलं नाही. मात्र कुटुंबियांनी अतिशय आग्रह केल्यानं त्यांनी रामायणाची प्रत भेट म्हणून स्वीकारली.
अवघ्या १७ मिनिटांत उरकलं लग्न; हुंडा नको म्हणणाऱ्या तरुणाला सासरच्यांकडून मिळाली 'खास' वस्तू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 10:57 PM