(Image Credit : Facebook/Diario de Hidalgo)
जगात क्वचितच असा देश असेल जिथे विद्यार्थी परीक्षेत कॉपी करत नसतील. कॉपी करणं थांबवण्यासाठी शिक्षकही वेगवेगळ्या आयडियाच्या कल्पना वापरताना दिसतात. असंच काहीसं वेगळं चित्र मेक्सिकोमध्ये बघायला मिळालं. एका शिक्षकाने इथे परीक्षेदरम्यान कॉपी रोखण्यासाठी अजब पद्धत वापरली. याचे काही फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.
गेल्या आठवड्यात मेक्सिकोच्या टेलेक्सकलामध्ये बॅचलर्स कॉलेज कॅम्पसमध्ये पदवीची परीक्षा सुरू होती. विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये म्हणून एल सबिनल कॉलेजचे अध्यक्ष लुइस जुआरेज टेक्सिस यांनी सर्वच विद्यार्थ्यांना कार्डबोर्ड बॉक्स घालून परिक्षा देण्यास सांगितले.
कॉपी रोखण्यासाठीची ही पद्धत जेव्हा सोशल मीडियात व्हायरल झाली, तेव्हा शिक्षकांवर टीका होऊ लागली. लोकांनी शिक्षकावर मानवाधिकाराच्या विरूद्ध जाऊन परिक्षा घेण्याचा आरोप लावला आहे. तर काही लोकांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना लुइस जुआरेज टेक्सिस यांना निलंबित करण्याची मागणी केली.
लोकांचं मत आहे की, अशाप्रकारच्या गोष्टी विरोधात कठोर पावले उचलली गेली पाहिजे. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जाऊ नये. शिक्षकांना बडतर्फ करून विद्यार्थ्यांसोबत होत असलेल्या अपमानाला रोखलं जाऊ शकतं. असं असलं तरी काही लोकांनी या अनोख्या पद्धतीची प्रशंसा केली.
(Image Credit : Social Media)
दरम्यान, २०१३ मध्ये थायलंडमध्येही असंच काहीसं प्रकरण बघायला मिळालं होतं. इथे कॉपी रोखण्यासाठी परीक्षेत विद्यार्थ्यांना पेपर शीटपासून तयार अॅंटी-हेल्मेट घालण्यात आले होते.