ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - केंद्र सरकारने पॅन कार्ड आणि बॅंक खात्यासोबत आधार कार्ड जोडणी बंधनकारक केली आहे. मात्र, अनेकांना पॅन कार्ड किंवा बॅंक खात्याला आधार कार्डशी संलग्न करण्यात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो आहे. आधार कार्डमध्ये नावाच्या स्पेलिंग वेगवेगळ्या असल्याने समस्या उद्भवण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, अनेकांना हे माहित नाही की आधार कार्डमध्ये दिलेली चुकीची माहिती दुरुस्तही करता येते. त्यासाठी आपणाजवळ दोन पर्याय आहेत.
घरबसल्या आधार कार्डमध्ये दुरूस्ती करण्यासाठी आधारच्या अधिकृत वेबसाईटला https://uidai.gov.in/ भेट द्यावी. वेबसाईट ओपन झाल्यावर ‘आपकी आधार’ हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावं. त्यानंतर एक पेज ओपन होईल. त्या पेजच्या खाली डाव्या बाजूला ‘अपडेट युअर आधार डेट’ असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावं. त्यानंतर ‘अपडेट डाटा ऑनलाइन’ हा पर्याय दिसेल त्या पेजवर आधार नंबर टाइप करावा त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल. मोबाइल नंबर टाकल्यानंतर तुमच्या नंबरवर एक ‘ओटीपी’ पाठवला जाईल. हा ओटीपी टाकल्यानंतर लॉगिन करता येईल.
एकदा लॉगिन झाल्यावर तुम्हाला चुकिची माहिती बदलता येईल. त्यासाठी ‘डाटा अपडेट रिक्वेस्ट’वर क्लिक करा, माहिती अपडेट करताना आपण ज्या माहितीमद्ये बदल करत आहात त्यासंबंधीचे कागदपत्रंही जवळ ठेवावेत कारण माहिती बदलताना तुम्हाला ते कागदपत्रं सोबत अपलोड लागतात . अपलोड झाल्यानंतर ‘अपडेट स्टेटस’ वर जाऊन आपला आधार नंबर आणि यूआरएन टाका. अशाप्रकारे तुम्हाला आधार कार्डच्या माहितीमध्ये बदल करता येईल.
याशिवाय दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही जवळच्या आधार सेवा केंद्रात जाऊन चुकिची माहिती बदलू शकतात, पण तेथे जाताना संबंधित कागदपत्रं बरोबर बाळगणं आवश्यक आहे.