प्रेमाला ना धर्म आहे, ना सीमा, ना वयाची मर्यादा..अलीकडेच अशा २ घटना समोर आल्यात ज्यामुळे ही वाक्ये तंतोतंत खरी जुळत आहेत. एकीकडे पाकिस्तानहून नेपाळमार्गे भारतात आलेली सीमा हैदर आणि आता अमेरिकेच्या टेक्सास येथून १४,८०० किमी अंतर पार करून भारताच्या आंध्र प्रदेशात पोहचलेली जॅकलिन फोरेरो..या दोन्ही महिलांची कहाणी वेगळी असली तरी त्यांच्यात एक समानता आहे ती म्हणजे दोघीही प्रेमाच्या शोधात इथपर्यंत आल्या ज्याचा विचारही कुणी केला नसेल.
सीमा हैदरची कहाणी एखाद्या सिनेमासारखी आहे. पाकिस्तानची नागरीक, नेपाळमार्गे बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी करते कारण तिला तिचं प्रेम मिळवायचे असते. तसेच टेक्सासमध्ये राहणाऱ्या जॅकलिनची कहाणी आहे. जगाच्या एका कोपऱ्यात असलेल्या अमेरिकेतील जॅकलिन फोरेरोचं आयुष्य संघर्षमय होते. २०२१ साली जंगलाला लागलेल्या आगीत तिने सर्व काही गमावले. जॅकलिनचं घर जळून राख झालं. पतीसोबतही घटस्फोट झाला. एकटेपणा आणि तुटलेला आत्मविश्वास यातही तिला कुणीतरी तिच्या आयुष्यातील हा अंधार दूर करेल अशी अपेक्षा होती. त्यानंतर इन्स्टाग्रामवर आलेल्या एका Hi मेसेजनं तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
जॅकलिन आणि चंदन यांची भेट इन्स्टावर झाली होती. सर्वात आधी जॅकलिननं मेसेज पाठवला होता. ज्यानंतर या दोघांमध्ये संवाद सुरू झाला. काही महिन्यातच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर जॅकलिन चंदनला भेटण्यासाठी सातासमुद्रापार भारतात आली. या कहाणीत खास गोष्ट म्हणजे जॅकलिन चंदनपेक्षा वयाने ९ वर्ष मोठी असून ती घटस्फोटीत आहे. अमेरिकेत राहणारी जॅकलिन ही व्यवसायाने फोटोग्राफर आहे. चंदनचं प्रोफाईल तिने पाहिले आणि त्याचा साधेपणा पाहून ती आकर्षित झाली.
जॅकलिनला चंदन आवडला आणि त्यानंतर तिने त्याला पहिला मेसेज केला. या मेसेजला उत्तर आल्यानंतर जॅकलिन आणि चंदन यांच्यात मैत्री झाली. १४ महिन्यांच्या या प्रेमानंतर दोघांनी एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर जॅकलिन आणि चंदन यांच्या वयावरून बऱ्याच नकारात्मक कमेंट आल्य परंतु जॅकलिन आणि चंदन या दोघांनी याकडे फार लक्ष न देता नात्यावर विश्वास ठेवत पुढचं पाऊल उचललं. जॅकलिनच्या आईनेही या नात्याचा स्वीकार करत दोघांना लग्नासाठी परवानगी दिली. सध्या दोघे त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात करत आहेत. चंदननेही व्हिसासाठी अर्ज केला असून लग्नानंतर दोघेही अमेरिकेत नवीन आयुष्य सुरू करणार आहेत.