(Image Credit : tribuneindia.com)
जर समजा तुमचं प्रेम दुसरं कुणीतरी घेऊन गेलं तर अर्थातच तुम्हाला दु:खं होईल. अनेक दिवस मनस्ताप होईल. तुम्ही ते दूर गेलेलं प्रेम परत मिळवण्याचाही प्रयत्न करू शकता. आणि एवढं सगळं करूनही तुम्हाला काही खास हाती लागताना दिसत नसेल तर तुम्ही नव्याने तुमचं आयुष्य सुरू कराल. पण अमेरिकेतील केविन होवार्डने थेट कायद्याची मदत घेतली. त्याने त्याच्या घटस्फोटीत पत्नीच्या बॉयफ्रेन्डवर 'लग्न तोडल्याची' केस दाखल केली. आश्चर्याची बाब म्हणजे कोर्टाने केविनच्या बाजूने निकाल दिला आणि नुकसान भरपाई म्हणून त्याला ७५०,००० डॉलर म्हणजेच ५.३२ कोटी रूपये देखील मिळतील.
अमेरिकेतील ७ स्टेट्समध्ये लागू आहे हा कायदा
केविन अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना इथे राहतो. हे यूएसमधील ७ स्टे्टसमध्ये येतं, जिथे alienation of affection चा कायदा लागू आहे. या कायद्यानुसार, पतीच्या प्रेमावर पत्नीचा आणि पत्नीच्या प्रेमावर पतीचा अधिकार आहे. जर कुणी या दोघांच्या प्रेमाच्या मधे आलं किंवा हे प्रेम चोरण्याचा प्रयत्न केला तर हा कायदेशीर गुन्हा आहे. याला homewrecker law असंही म्हणतात.
'तो माझ्या घरी यायचा, सोबतही डिनरही केलं होतं'
हा कायदा अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनासोबतच हवाई, इलिनोय, न्यू मेक्सिको, मिसिसिपी, साऊथ डकोटा आणि यूटा इथेही लागू आहे. केविन सांगतो की, 'तो माझ्या पत्नीच्या ऑफिसमध्ये काम करत होता. तो आमच्या घरीही येत होता. आम्ही सोबत अनेकदा जेवणही केलं. मला असं वाटायचं तो मित्र आहे. ही केस पैशांसाठी नाहीये. तर त्याला फसवणुकीची शिक्षा मिळायला हवी. विश्वास तोडण्याची शिक्षा'.
१२ वर्षांच्या लग्नानंतर घटस्फोट
केविन आणि त्याची घटस्फोटीत पत्नी १२ वर्ष संसार करून वेगळे झाले. केविनने कोर्टात सांगितले की, 'माझी पत्नी मला घटस्फोटावेळी म्हणाली होती की, मी तिला वेळ देऊ शकत नाही. कामात जास्त व्यस्त राहतो. गरजेच्या वेळी तो जवळ राहत नाही. आम्ही यावर बोललो सुद्धा, पण तिला घटस्फोट हवा होता'.
प्रायव्हेट डिटेक्टिवने केला खुलासा
केविन म्हणाला की, पत्नीपासून वेगळे झाल्यावर तो पूर्णपणे बिथरला होता. दोघांनी लग्न वाचवण्यासाठी काउन्सेलिंगचे सेशन्सही केले. पण तरिही लग्न तुटलं. केविन सांगतो की, त्याचा विश्वासच बसत नव्हता की, असं काही होऊ शकतं. अशात त्याने एका प्रायव्हेट डिटेक्टिवला कामावर ठेवलं. त्यानेच केविनला सांगितलं की, त्याच्या पत्नीचा एक प्रेमी आहे आणि ही फसवणुकीची केस आहे.