काही वेळा काही माणसं जन्मजातच काही जगावेगळ्या गोष्टी घेऊन येतात. काहींची शारीरिक स्थिती सर्वसामान्यांपेक्षा खूप वेगळी असते. उदाहरणार्थ, काही लोकांच्या हाताला पाच नाही तर सहा बोटं असतात. काहींचे हात अजानूबाहू म्हणजे गुडघ्याच्या खाली येतील इतके लांब असतात. अमेरिकेत (USA) सध्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या माणसाचा हात चक्क इतरांपेक्षा प्रचंड रुंद (Huge Hand) आहे. याचे हात पाहून कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. सर्वसामान्य माणसांच्या हातांच्या तुलनेत याचे हात अतिविशाल आहेत. सनी देओलचा 'ढाई किलो का हाथ' हा डायलॉग सगळ्यांना माहीत आहे. तसंच प्रसिद्ध कार्टून पॉपॉयचा (Popoy) हातही त्याच्या शरीरापेक्षा मोठा असल्याचं दाखवण्यात आलं आहे. मात्र प्रत्यक्षात असा कुणाचा अतिविशाल हात असेल याची कल्पना करणं कठीण आहे; पण हे सत्य आहे.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतील मिनेसोटा (Minnesota) इथं राहणाऱ्या 48 वर्षांच्या जेफ डाबे (Jeff Dabe) याचे हात इतर लोकांच्या तुलनेत प्रचंड मोठे आहेत. जेफ त्याच्या अशा भल्यामोठ्या हातांमुळे खूप प्रसिद्ध आहे. एवढंच नाही तर फ्लोरिडा इथं होणाऱ्या इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ आर्म रेसलिंग ग्रँडमास्टर टूर्नामेंटमध्येही त्याने अनेकवेळा भाग घेतला असून, त्यात त्यानं अनेक वेळा विजयही मिळवला आहे.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जेफच्या हाताचा घेर तब्बल 19.30 इंच आहे. नुकताच त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात त्यानं हातात अमेरिकन डॉलर धरले असून, ते एखाद्या कागदाच्या लहान तुकड्यासारखे दिसत आहेत. तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये तो त्याच्या लग्नाची अंगठी (Ring) घालताना दिसत आहे. त्याच्या अंगठीचा आकार 5 इंच आहे. जेफचा हात इतका मोठा आहे की तो दोन बास्केटबॉल (Basketball) एकावेळी हातात धरू शकतो.
असे जगावेगळे हात असलेल्या जेफला या हातांच्या अशा रचनेमुळे रोजच्या कामात कोणतीही अडचण होत नाही. इतके मोठे हात असण्याने आपलं कोणतही नुकसान होत नाही, असं जेफ म्हणतो. सामान्य लोकांप्रमाणेच तो सर्व काम करू शकतो. फक्त त्याला एकच अडचण येते ती म्हणजे त्याला त्याच्या हाताच्या आकाराचे हातमोजे (Hand Gloves) मिळत नाहीत.
फॉक्स न्यूजशी बोलताना जेफने सांगितले की, डॉक्टरांनी त्याच्या सर्व चाचण्या करून त्याला हत्तीरोग झाला आहे का हे तपासले. परंतु प्रत्येकवेळी त्याचा अहवाल नॉर्मल आला. डॉक्टरांना त्याला कसलाही आजार असल्याचं आढळलं नाही, त्यामुळे डॉक्टरांनादेखील आश्चर्य वाटत आहे.