चांगल्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा यासाठी अनेकजण काय काय करत नसतील. पण यासाठी केवळ मेरिट असणंच पुरेसं नसतं. त्यासाठी फार खटाटोपी कराव्या लागतात. पण अमेरिकेतील यकेलिया बेकरचं नशीब चांगलंच जोरावर आहे. तिला तब्बल ५० चांगल्या कॉलेजेसमधून प्रवेशासाठी आमंत्रण आलं आहे. इतकंच नाही तर तिला ८ कोटी रूपायांची स्कॉलरशिप सुद्धा ऑफर करण्यात आली आहे.
यकेलिया जॉर्जियाला राहणारी आहे. ती लुसी सी. लॅन हायस्कूलमधून पास झाली. असे सांगितले जात आहे की, स्कूल संपल्यावर यकेलिया तासंतास वेगवेगळ्या कॉलेजसमध्ये प्रवेशासाठी अर्ज करत बसत होती. मजेदार बाब ही आहे की, ती केवळ प्रवेशासाठी अर्ज करत गेली. तिने कॉलेज घरापासून किती दूर असेल किंवा दुसऱ्या शहरात जावं लागेल याचा विचार केला नाही. फक्त तिला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश हवा होता.
एबीसी न्यूजच्या रिपोर्टनुसार, 'एक वेळ अशी आली होती, जेव्हा मला दरदिवशी कोणत्या ना कोणत्या कॉलेजमधून प्रवेशाची ऑफर येत होती. माझे अर्ज स्विकारले जात होते'.
यकेलियाची आई डेंसी बेकर ही मिलिट्रीमध्ये होती. यकेलिया तिच्या या यशाचं श्रेय तिच्या आईच्या शिस्तीच्या जीवनाला देते. ती सांगते की, 'माझी आई मला नेहमी प्रेरणा देते. ती माझी रोल मॉडेल आहे'. तर तिची आई सांगते की, तिला तिच्या मुलीवर गर्व आहे.
वॉशिंग्टन पोस्टसोबत बोलताना यकेलिया म्हणाली की, 'माझी पेन स्टेट बीवरमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे. इथे मला अॅथलिटसाठी स्कॉलरशीपही मिळाली आहे. मला यातून एक गोष्ट शिकायला मिळाली की, जगात शिकण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी कोणतीही जागा लहान नाहीये'.