प्रेमात दगा मिळाला किंवा नकार मिळाला तर प्रियकर वा प्रेयसींची काय हालत होते हे तुम्हाला चांगलंच माहीत असेल. हे लोक आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणीत दिवसरात्र अश्रू ढाळत असतात. त्यांच्या वस्तू, त्यांचे फोटोज पुन्हा पुन्हा बघतात. नकार किंवा दगा मिळाल्याने हे लोक चिडलेले असतात. पण ते राग व्यक्ती करू शकत नाहीत. पण आपला संताप व्यक्त करण्याची एक सुवर्णसंधी समोर आली आहे. एका प्राणीसंग्रहालयाने प्रेमात अपयशी ठरलेल्या दिलजलेंसाठी एक अनोखी ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार लोक आपल्या जुन्या प्रेयसीला किंवा प्रियकरावर आपला राग व्यक्त करू शकतील आणि याने त्यांना ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर येण्याची संधी मिळेल.
अमेरिकेतील टेक्सास प्रांतात सेन एंटोनियो नावाचं एक प्राणी संग्रहालय आहे. या प्राणी संग्रहालयाच्या प्रशासनाने येत्या व्हॅलेंटाइन डे म्हणजे १४ फेब्रुवारीसाठी पर्यटकांसाठी एक अनोखी ऑफर आणली आहे. ही एक फन अॅक्टिविटी आहे. ज्यात लोक झुरळ आणि उंदरांची नाव आपल्या एक्स लव्हरच्या नावावर ठेवू शकतील. म्हणजे येथील झुरळ आणि उंदरांना तुमच्या एक्स लव्हरचं नाव ठेवता येईल. नाव ठेवण्यापर्यंत ठीक आहे. पण तेच झुरळ आणि उंदीर एखाद्या प्राण्याला खाऊ घातले तर काय विचार कराल. हे असंच होणार आहे. ज्या झुरळ किंवा उंदराला तुमच्या एक्स लव्हरचं नाव दिलं आहे. ते तुम्हाला एखाद्या प्राण्याला खाऊ घालण्याची संधी दिली जाणार आहे.
प्राणी संग्रहालयाचा असा विचार आहे की, एका जीवाला नाव देऊन ते दुसऱ्या प्राण्याला खाऊ घातल्याने त्या लोकांना आनंद मिळले जे प्रेमात मिळालेल्या दग्याने खचलेले आहेत किंवा रिजेक्शनमुळे बिथरलेले आहेत. ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्हाला हा त्रास होतोय त्याचं नाव एका जीवाला दिलं आणि तो जीव दुसऱ्या प्राण्याला खाऊ घातला तर व्यक्तीच्या मनाला शांतता मिळेल.
याबाबत जास्त करण्याआधी हे जाणून घ्या की, हा एक फंडरेजिंग प्रोग्राम आहे ज्याचं नाव आहे क्राय मी ए कॉकरोच. यातून मिळणारे पैसे सामाजिक कामासाठी खर्च केले जातील. एका झुरळाचं नामकरण करण्यासाठी लोकांना पाच डॉलर द्यावे लागतील. आणि ते झुरळ दुसऱ्या प्राण्याला खाऊ घालण्यासाठी तुम्हाला २५ डॉलर द्यावे लागतील. म्हणजे नवीन प्रेम शोधण्याआधी आपल्या मनातील दु:खं दूर करायचं असेल तर ही आयडिया मजेदार ठरू शकते. तुम्ही झुरळाऐवजी एखाद्या उंदराचं किंवा भाजीचंही नामकरण करू शकता.
होऊ शकतं की, प्राणी संग्रहालयाची ही आयडिया तुम्हाला आवडली नसेल आणि तुम्हाला याने त्रासही होऊ शकतो. तर अशात तुम्ही त्यांच्या वेबसाइटवर जाऊन प्रतिक्रियाही देऊ शकता. पण असंही होऊ शकतं की, या आयडियाने काही प्रेमात बिथरलेल्या लोकांच्या मनाला शांतता मिळेल.