ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - लांबसडक, जाडजुड, चमकदार व मऊ केस कुणाला आवडणार नाहीत. केसांची काळजी घेण्याच्या नावाखाली अनेक जण हल्ली केमिकलयुक्त ट्रिटमेंट करुन त्यावर हजारो रुपये खर्च करुन कित्येक तास पार्लरमध्ये वाया घालवतात.
मात्र, ज्या कंगव्याने तुम्ही केस विंचरता तो कंगवा बदलण्याचा विचार कधी तुम्ही केला आहे?. नाही असे उत्तर असेल तर मग आधी कंगवा बदलण्याच्या दिशेनं विचार करा.
केस विंचरण्याच्या कंगव्यामध्येही अनेक प्रकार आहेत. निरनिराळ्या प्रकारचा कंगवा सध्या बाजारात उपलब्ध आहेत. पण तुमच्या केसांसाठी कोणता कंगवा उपयुक्त आणि फायदेशीर ठरेल, कदाचित याची माहिती तुम्हालाही नसेल.
प्लास्टिकचा कंगवा वापरण्याऐवजी लाकडी कंगवा वापरल्यास तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. लाकडाच्या कंगव्याने तुम्ही तुमच्या केसांची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकता.
लाकडी कंगव्याचे फायदे
टाळूसाठी उपयुक्त :
लाकूड ही एक नैसर्गिक वस्तू आहे. केस विंचरण्यासाठी याचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. लाकडी कंगव्याच्या वापरामुळे टाळू निरोगी राहण्यास मदत होते. यामुळे रक्तभिसरण चांगले पद्धतीने होते. टाळू निरोगी राहिल्याने केसांचेही आरोग्य योग्य पद्धतीने सुधारते.
केसांची वाढ होण्यास मदत :
लाकूड हा एक निसर्गाचा भाग आहे. नैसर्गिक गोष्टी शरीरासाठी कधीही अपायकारक नसतात. त्यामुळे लाकडी कंगव्याच्या वापरामुळे केसांची वाढदेखील योग्य प्रकारे होण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त केस मजबूतदेखील होतात.
तज्ज्ञांचं असे म्हणण आहे की, लाकडी कंगव्याच्या वापरामुळे केसांना कोणताही अपाय होत नाही. लाकडी कंगव्याने ओले केस विचारल्यास नेहमीच्या वापरातील कंगव्याच्या तुलनेनं केस कमी प्रमाणात तुटतात.
कोंड्यावर उत्तम उपाय :
अनेक जण कोड्यांच्या समस्येमुळे हैराण झालेले असतात. कोड्यांच्या समस्येमुळे खरंतर केस नाही तर टाळूच्या त्वचेवर परिणाम होतो. ही समस्या कमी करायची असल्यास लाकडी कंगवा वापरणं केव्हाही चांगले. यामुळे केसांमधील कोंडा कमी होण्यासही मदत होते.