आजकाल आरोग्य विश्वातून अशा अशा घटना समोर येत आहेत ज्या वाचून किंवा बघून सगळेच हैराण होतात. सध्या गोरखपूरमधून अशीच एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. इथे एका तरूणाचं हर्नियाचं ऑपरेशन करत असताना डॉक्टरांना त्याच्या पोटात असं काही दिसलं जे बघून त्यांना धक्का बसला.
पुरूष आण महिलांचं शरीर वेगवेगळं असतं. महिला बाळांना जन्म देऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या शरीरात गर्भाशय असतं. मात्र, गोरखपूरमध्ये ज्या तरूणावर डॉक्टर सर्जरी करत होते त्याच्या पोटात त्यांना गर्भाशय आणि अंडाशय दिसून आलं. त्यामुळे डॉक्टरही प्रश्नात पडले. या तरूणाच्या पोटात बऱ्याच दिवसांपासून दुखत होतं. डॉक्टरांनी त्याला हर्नियाच्या ऑपरेशनसाठी दाखल करून घेतलं होतं. तेव्हाच या गोष्टीचा खुलासा झाला.
इथे राहणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीच्या पोटात बऱ्याच दिवसांपासून वेदना होत होत्या. ही व्यक्ती मजुरीचं काम करते. पोटाची समस्या खूप जास्त वाढल्यावर तो त्याच्या बहिणीकडे आला. डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी अल्ट्रासाऊंड करण्यास सांगितलं. तसेच त्यांनी पोटदुखीचं कारण हर्निया असल्याचं सांगितलं. त्याला सर्जरीसाठी बोलवण्यात आलं. पण जेव्हा त्याचं पोट फाडण्यात आलं तेव्हा आत गर्भाशय दिसून आलं.
रूग्णावर ऑपरेश एका खाजगी हॉस्पिटलमध्ये आयोजित फ्री चेकअप कॅम्पमध्ये केलं जात होतं. डॉक्टरांनी व्यक्तीच्या पोटातून मांसाचा तुकडा बाहेर काढला. टेस्ट केल्यावर समजलं की, हा मांसाचा तुकडा म्हणजे अविकसित गर्भाशय आहे. सोबतच अंडाशयही मिळालं. डॉक्टरांनुसार ही केस फारच अनोखी आहे. अशा केसेस फार कमी समोर येतात. व्यक्तीच्या कुटुंबियांनुसार, त्याच्यात महिलांसारखी कोणतीही लक्षणे नव्हती. त्याचं ऑपरेशन यशस्वी झालं असून तो रिकव्हर होत आहे.