ई-कॉमर्स कंपनी Myntra चा लोगो आक्षेपार्ह असल्याचं सांगत वाद निर्माण झाला होता. मुंबईतील एका महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी मिंत्राचा लोगो महिलांसाठी आक्षेपार्ह असल्याचं म्हटलं होतं. परंतु यानंतर आता मिंत्रानं आपला लोगो बदलला आहे. एका वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात महिला सामाजिक कार्यकर्त्या नाझ पटेल यांनी मुंबई सायबर क्राईम पोलिसांकडे एक तक्रार दाखल केली होती. एनजीओ अवेस्ता फाऊंडेशनच्या संस्थापक नाझ पटेल यांनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म मित्राचा लोगो बदलण्यात यावा आणि त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली होती."एका तक्रारदारानं या प्रकरणी सायबर गुन्हे विभागाशी यासंदर्भात संपर्क साधला होता. त्यांच्या तक्रारीनंतर आम्ही मिंत्रा या कंपनीच्या अधिकाऱ्यासोबत एक बैठक घेतली. या बैठकीत कंपनीचे अधिकारी हा लोगो बदलण्यास सहमत झाले. त्यांनी यासंदर्भाक एक ईमेलही पाठवला होता," अशी माहिती पोलीस उपायुक्त (सायबर गुन्हे) रश्मी करंदीकर यांनी दिली.
मिंत्राच्या नव्या लोगोमध्ये गुलाबी आणि नारिंगी रंगाचा वापर करण्यात आला आहे. तसंच त्यांच्या लोगोमध्ये थोडे बदलही करण्यात आले आहेत. मिंत्रानं आपला लोगो बदलल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा महापूर पाहायला मिळाला. इतकंच काय तर स्विगी आणि झोमॅटोनंदेखील याची मजा घेतली.