आगरा- सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. तो व्हिडीओ पाहून अगदी सगळेच हैराण होतील. आगऱ्यामध्ये एक तीन मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळलेली या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते आहे. अगदी काही सेकंदात ही इमारत जमीनदोस्त झाल्याचं व्हिडीओत पाहायला मिळतं आहे. आगऱ्यातील टीलेवाली गल्लीतील ही घटना आहे. उंदरांनी इमारतीचा पाया पोखरल्यानं तीन मजली इमारत कोसळल्याचं बोललं जात आहे.
सुदैवाने इमारतीतल्या लोकांनी वेळीच इमारत खाली केल्यानं जीवितहानी टळली. इमारतीची अवस्था जर्जर झाल्यानं काही दिवसांपूर्वीच रहिवाशांनी ही इमारत सोडली होती. तीन मजली इमारत काही सेकंदात कोसळण्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
8 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून इमारत पडल्यावर सगळीकडे मोठ्या प्रमाणात धूळ दिसते आहे. एनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
दरम्यान, असाच एक प्रकार आंध्र प्रदेशातील गंटुरमध्ये घडला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात तिथे अशा प्रकारे इमारत पडली. त्या घटनेतही जिवीतहानी झाली नाही.