कोरोना व्हायरसचं थैमान जगभरात सुरू आहे. जगातल्या 175 देशांना कोरोनाचा फटका बसला आहे. 18 हजार लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. म्हणून कोरोनापासून बचावासाठी जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलंय. पण असेही काही लोक आहेत ज्यांना याचं अजिबात गांभीर्य नाही. लोक बिनधास्त घराबाहेर पडत आहेत. अशाच काही तरूणांना पोलिसांनी थेट हेलिकॉप्टर आणून धडा शिकवला.
ही घटना आहे ब्राझीलमधील.ब्राझीलमध्येही कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. इथे 2 हजार 201 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 46 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं ब्राझीलमध्येही लॉकडाऊन करण्यात आला आहे. पण काही तरूण समुद्रकिनाऱ्यावर एन्जॉय करताना दिसले.
या लोकांना पळवण्यासाठी ब्राझिलियन पोलिसांनी समुद्रकिनारी थेट हेलिकॉप्टर उडवून वाळूचे वादळ तयार केले. फ्लोरियानो पोलिस गॅल्हेटा बीचवर लोकांवर वाळूचे कण उडवण्यासाठी हेलिकॉप्टर घेऊन आले. जेणेकरून लोक तिथून जातील आणि घरात सुरक्षित राहतील.
पोलिसांनी सांगितले की, कोरोनाच्या थैमानातही लोक समुद्रकिनारी गर्दी करत आहेत. त्यामुळं आम्हाला असं करावं लागलं. बरेच लोक पळून गेले. दरम्यान सरकारने 17 मार्च रोजी आणीबाणी घोषित केली आणि लोकांना मोठ्या गटांत जमण्यास मनाई केली आणि सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.