मुरादनगर: सर्व सुविधा हव्यात, पण जबाबदारी नको. शक्य तेवढं फुकट हवं, अशी मानसिकता असणारी असंख्य मंडळी आपल्या देशात आहेत. अनेकदा अशा व्यक्ती आसपास दिसतात आणि त्यांच्या वृत्तीचा प्रत्यय येतो. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील मुरादनगर परिसरात याच वृत्तीचा एक 'नमुना' पाहायला मिळाला आहे. मुरादनगर परिसरातील एका घरातून विजेची चोरी होत असल्याची माहिती वीज विभागाला मिळाली. त्यामुळे वीजचोरी रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांनी घरावर छापा टाकला.
वीज कर्मचाऱ्यांची चाहूल लागताच घरातील एकाही सदस्यानं दरवाजा उघडला नाही. त्यामुळे वीज विभागाचा एक लाईनमन शेजारच्या छतावर चढला. वीज विभागाचा कर्मचारी शेजारच्या घराच्या बाल्कनीत उभा राहिला. तेवढ्यात दार उघडत नसलेल्या घरातील एक जण अगदी रांगत रांगत वीज चोरीचा पुरावा नष्ट करण्यासाठी बाल्कनीत आला. तो पुरावा मिटवणार इतक्यात, 'भैय्या, मै तो इधर ही खडा हूँ' म्हटलं. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ ६ जूनचा असल्याची माहिती मुरादनगरच्या वीज विभागाचे एसडीओ अभिषेक मौर्य यांनी दिली. 'अद्याप अपेक्षित पाऊस न झाल्यानं उकाडा अधिक आहे. त्यामुळे वीजेचा वापर जास्त आहे. जास्त लोड आल्यानं वीजपुरवठा अधूनमधून खंडित होत असतो. काही लोक वीजचोरी करत असल्यानं समस्या वाढते. अशाच एका घराची तक्रार आम्हाला मिळाली. त्यामुळेच त्या घरावर धाड टाकण्यात आली,' असं मौर्य यांनी सांगितलं.
'अधिकारी छापा मारण्यासाठी ६ जूनला घराजवळ पोहोचले. त्यांनी वारंवार दरवाजा वाजवला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्याचवेळी एक लाईनमन शेजारील घराच्या छतावर चढला. त्यावेळी एक व्यक्ती पुरावे नष्ट करायला आला. लाईनमननं त्याला रोखलं. त्या व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अशाच प्रकारे १५ ठिकाणी छापे टाकण्यात आले. दोषींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,' अशी माहिती मौर्य यांनी दिली.