ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 01 - म्हशींच्या गळ्यात माळा, पायात चांदीचे पैंजण, शिंगांमध्ये मोरपिसारा, पाठीच्या केसांवर कोरीव काम करून सजविलेल्या म्हशी, मालकांच्या हाकेसरशी आणि मोटारसायकलच्या आवाजावर मागे धावणा-या म्हशी पाहण्यासाठी सागरमाळ येथे मंगळवारी सायंकाळी नागरिकांनी मोठी गर्दी केली, निमित्त होते भाऊबिजेनिमित्त सागरोबा देवाच्या दर्शनाचे.
भाऊबिजेदिवशी सम्राटनगर येथील सागरमाळ येथील सागरोबा देवाच्या दर्शनासाठी म्हशीसोबत येतात. देवाला अभिषेक घालण्याची जुनी परंपरा आहे. भाऊबिजेच्या आजच्यादर्शनानंतर वर्षभर म्हशी विविध स्पर्धेत सहभाग होतात, अशी पद्धत आहे. ही परंपरा जपण्यासाठी मंगळवारी मालकांची पावले सागरमाळाकडे वळू लागली. दुपारी साडेतीननंतर अनेक मालक आपल्या म्हशीसोबत ठेवणीतील कपडे घालून, खांद्यावर लाल रूमाल, हातात काठी घेऊन हलगीच्या कडकडात वाजत-गाजत या ठिकाणी सहभागी होतात.