मानव आणि प्राणी यांच्यातील मैत्री नेहमीच खास राहिली आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथून समोर आली आहे. एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा मित्र असलेला माकड घरी आलं. मृतदेहाजवळ बसलं. माकडाने कुटुंबातील रडणाऱ्या महिलांचंही त्यांच्या जवळ जाऊन सांत्वन केलं.
शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर माकडाला रडू आलं. हा भावनिक क्षण उपस्थित असलेल्या लोकांनी कॅमेऱ्यात कैद केला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण लखीमपूर खेरी जिल्ह्यातील बिजुआ भागात असलेल्या गोंधिया गावातील आहे.
65 वर्षीय चंदन वर्मा आपल्या कुटुंबासह येथे राहत होते. चंदन गेल्या काही वर्षांपासून कोणत्यातरी आजाराने त्रस्त होते अशी माहिती समोर आली आहे. नुकतेच त्यांचे निधन झाले. मृतदेह घराच्या अंगणात ठेवण्यात आला होता. कुटुंबावर शोककळा पसरली होती. इतक्यात एक माकड तिथे पोहोचलं.
माकड मृतदेहाजवळ बसून रडू लागलं. यानंतर माकड जवळच असलेल्या महिलेपर्यंत पोहोचलं. तिचे सांत्वन करू लागलं. हा सगळा प्रकार पाहून कुटुंबीयांनाही आश्चर्य वाटलं. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदन हे त्यांच्या शेतात जाताना माकडासोबत त्यांची मैत्री झाली होती. ते या माकडाला अन्न द्यायचे आणि अनेक वर्षांपासून मैत्री होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.