जगभरातून अनेकदा अशा अशा घटना समोर येतात ज्या आपल्याला हे मान्य करायला भाग पाडतात की, आपण कितीही म्हणालो की या जगात माणूसकी शिल्लक नाही, मात्र अजूनही काही प्रमाणात माणूसकी शिल्लक आहे. कुणी आपला जीव धोक्यात टाकून अनोळखी लोकांची मदत करतात तर कुणी कुणाला मदत करतात. सध्या अशीच एक चेहऱ्यावर हसू फुलवणारी घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बरेच लोक असे असतात जे मुक्या प्राण्यांना मदत करतात. एका तरूणीने असंच केलं आणि एका प्राण्याला जीवनदान दिलं.
एका हेजहॉग जीवाला मरणाच्या दारातून परत आणलं. ट्विटर अकाऊंट @AMAZlNGNATURE वर प्राणी, निसर्ग, झाडी यांच्याबाबत अनेक चांगले व्हिडीओ शेअर केले जातात. याच अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात दाखवण्यात आलं की, एका तरूणीने हेजहॉगचा जीव कसा वाचवला आणि त्याचा कसा सांभाळ केला. त्याला आपल्या लेकरासारखं सांभाळून मोठं केलं.
व्हायरल व्हिडीओमध्ये तरूणीने त्याला कसं सांभाळलं त्याचा पूर्ण प्रवास दाखवला आहे जो बघून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू फुलेल आणि तरूणीचं तुम्ही कौतुक कराल. हा जीव तिला बोटा इतका लहान असताना सापडला होता. तिने त्याला खूप जपलं, त्याला खाऊ घातलं आणि आता हा जीव चांगलाच मोठा झाला आहे.
या व्हिडीओला १ कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि अनेक लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिलं की, चष्मा लावून तो जास्त क्यूट दिसत आहे. तर दुसऱ्याने लिहिलं की, हे माणूसकी जिवंत असल्याचं उदाहरण आहे. तिसऱ्याने लिहिलं की, एखाद्या व्यक्तीत इतकी सहनशक्ती असू शकते. ही फार मोठी बाब आहे.