आयुष्य़ात यश संपादन करण्यासाठी तसेच अधिक पैसे कमावण्यासाठी साधरण वर्षभरानंतर अनेक जण नोकरी बदलतात. सध्या हा ट्रेंड वाढलेला पाहायला मिळत आहे. मात्र असे ही काही लोक असतात. जे कित्येक वर्षे एकाच कंपनीत प्रामाणिकपणे आपलं काम करत असतात. अशा कंपन्या आणि मालक आपल्या कर्मचाऱ्यांना कधी-कधी त्यांच्या सेवेबाबत गिफ्ट देतात. यामुळे कर्मचारीदेखील आनंदी होऊन अधिक उत्साहाने काम करतात. अशीच एक कौतुकास्पद घटना आता समोर आली आहे. केरळमधील एका कर्मचाऱ्याला त्याच्या कष्टाचं फळ मिळालं आहे. बॉसने थेट 45 लाखांची मर्सिडीज गिफ्ट म्हणून दिली आहे.
केरळचे बिझनेसमन एके शाजी (AK Shaji) यांनी आपल्या एका कर्मचाऱ्याला महागडं आणि खास गिफ्ट दिलं आहे. शाजी हे रिटेल आऊटलेट चेन MyG चे मालक आहेत आणि केरळमध्ये त्यांचे 100 हून अधिक स्टोर आहेत. त्यांनी गेल्या 22 वर्षांपासून आपल्यासोबत काम करत असलेल्या सीआर अनिश (Anish) यांना मर्सिडीज-बेंझ जीएलए क्लास 220 डी (Mercedes-Benz GLA Class 220 d) गाडी भेट दिली आहे. उद्योगपती एके शाजी यांनी सीआर अनिश आणि त्यांच्या कुटुंबियांना काळ्या रंगाची कार भेट दिली. याबाबत त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्टदेखील लिहिली.
"अनि गेल्या 22 वर्षांपासून माझ्यासोबत आहे"
"प्रिय अनि... गेल्या 22 वर्षांपासून तू माझ्यासाठी एक मजबूत आधारस्तंभ राहिला आहेस. तुला ही नवीन क्रूझिंग पार्टनर आवडेल अशी आशा आहे" अशी भावनिक पोस्ट शाजी यांनी केली आहे. शाजी यांनी MyG चे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अनिशला आश्चर्यचा धक्का दिला. "आम्ही भागीदार आहोत, मी त्याला कर्मचारी मानत नाही. मी खूप आनंदी आहे. माझ्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. अनि गेल्या 22 वर्षांपासून माझ्यासोबत आहे. मी आशा करतो की यावर्षी आणखी अशा भागीदारांना मी कार देऊ शकेन" अशी प्रतिक्रिया शाजी यांनी दिली आहे.
"सहा कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक कार भेट दिली होती"
MyGच्या स्थापनेपूर्वीपासून अनिश आणि शाजी एकमेकांच्या सोबत आहेत. अनिश यांनी कंपनीच्या मार्केटिंग, मेंटेनन्स आणि डेव्हलपमेंट युनिट्समध्ये काम केलं आहे. ते उत्तर केरळमधील कोझिकोड जिल्ह्यात राहतात. उद्योगपती ए के शाजी यांनी त्यांच्या कर्मचार्यांना निष्ठेबद्दल बक्षीस देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. दोन वर्षांपूर्वीदेखील शाजी यांनी त्यांच्या सहा कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक कार भेट दिली होती. कार गिफ्ट मिळाल्यानंतर अनिश इमोशनल झाले. 'सर्वांच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झालं आहे. मी आशा करतो की भविष्यात सुद्धा आपण सोबत राहू,' असं अनिश यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.