गुजरातमधील रहिवासी असलेल्या क्षमा बिंदूने वर्षभरापूर्वी स्वतःशीच लग्न केलं होतं. तिच्या या निर्णयाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या तर काहींना धक्का बसला. मात्र आता क्षमा बिंदू तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे. सहसा लोक लग्नाचा वाढदिवस एकत्र साजरा करतात. दोघेही एकमेकांना भेटवस्तू देतात. पण इथे स्वतःशीच लग्न करणारी क्षमा एकटीच तिचा वाढदिवस आनंदाने साजरा करत आहे.
लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्याचं क्षमाने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगितलं आहे. क्षमाने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एकला चलो रे टॅटूही दिसत आहे. लग्नाच्या वाढदिवसाचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर लोक क्षमाचं अभिनंदन करत आहेत. हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे. क्षमा ही भारतातील पहिली महिला आहे जिने वयाच्या 24 व्या वर्षी स्वतःशी लग्न केले. लग्न समारंभासाठी बिंदूने तिच्या जवळच्या मित्रांना आणि नातेवाईकांना आमंत्रित केलं होतं.
क्षमाने विधीवत, मोठ्या थाटामाटात लग्न केलं. तिने सांगितले की, तिच्या आईने स्वतःशी लग्न करण्याच्या निर्णयात तिला कसा पाठिंबा दिला. लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. स्वत:शी लग्न केल्यानंतर क्षमाचे आयुष्य अजिबात सोपं राहिलं नाही. गुजरातमधील वडोदरा येथील सुभानपुरा भागात राहणाऱ्या क्षमाला लग्नानंतर तिचं शहर सोडावं लागलं. एवढेच नाही तर क्षमाने नोकरीही सोडली होती. क्षमा ज्या सोसायटीत राहत होती त्या घरमालकाने तिला घर रिकामं करण्यास सांगितलं.
सोसायटीच्या दबावाखाली घरमालकाने हा निर्णय घेतला. क्षमाने याबाबत माहिती दिली होती आणि मी सध्या कोणत्या शहरात राहते हे सांगणार नाही, असं सांगितलं होतं. 11 जून रोजी क्षमाने स्वतःशी लग्न केलं. क्षमाने एकटीनेच लग्न करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. हिंदू धर्मात अशी तरतूद नाही, त्यामुळे यानंतर वाद सुरू झाले. मंदिरातही असे विवाह करू नयेत, असा इशारा देण्यात आला. पण क्षमाने नवरदेवाशिवाय मंडपात सप्तपदी घेतले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.