ऑनलाइन लोकमत -
हरियाणा, दि. 30 - वरातीमध्ये उत्साहाच्या भरात करण्यात येणा-या गोळीबारात जखमी होण्याचा तसंच मृत्यू होण्याच्या घटना होत असतानादेखील ही परंपरा अजूनही चालू आहे. अशाच प्रकारे हरियाणामधील हिस्सार जिल्ह्यात करण्यात आलेल्या फायरिंगमध्ये नवरदेवच जखमी झाल्याची घटना घडली आहे. नवरदेव जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अमन सैनी यांचा विवाह ममता सैनी यांच्यासोबत ठरला होता. 28 एप्रिलला हे लग्न पार पडणार होतं. अमन सैनी लग्नसोहळ्यासाठी पोहोचले असताना गेटवर स्वागतासाठी वधू पक्षाचे लोक पोहोचले होते. त्यावेळी काही नातेवाईक गोळीबार करत होते. अमन सैनी यांच्यासमोरच एक नातेवाईक बंदूक घेऊन उभा होता. गर्दी खूप होती आणि त्याचवेळी बंदुकीतून सुटलेली गोळी अमन सैनी यांना लागली आणि खाली कोसळले.
सुदैवानी अमन सैनी फक्त जखमी झाले असून सध्या धोक्याबाहेर आहेत. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून व्हिडीओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून गोळी चालवणाऱ्याचा शोध सुरु आहे.