इस्लामाबाद - जगभरातील पत्रकार हे त्यांच्या दर्जेदार कामामुळे चर्चेत येत असतात. मात्र पाकिस्तानमधीलपत्रकारांची बातच और आहे. येथील पत्रकार प्राण्यांच्या मुलाखतींमुळे चर्चेत येत असतात. आता पाकिस्तानमधील प्रसिद्ध पत्रकार अमिन हफिझ यांचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्हाला आठवत असेल तर याच पत्रकार महोदयांनी काही काळापूर्वी एका गाढवाची मुलाखत घेतली होती. आता हफिझ यांनी ईदच्या निमित्ताने एका म्हशीची मुलाखत घेतली आहे. तसेच या म्हशीनेसुद्धा त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली आहे. सवाल-जवाबामुळे गाजलेली मुलाखत सध्या सोशच मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. (Pakistani journalist interviews buffalo on Eid day, can't stop laughing after listening to questions and answers)
नायला इनायत नावाच्या तरुणीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पत्रकार हाफिझ एका म्हशीसमोर माईक नेऊन तिला प्रश्न विचारताना दिसत आहे. तुम्हाला लाहोर शहरात येऊन कसं वाटतंय, असा प्रश्न विचारला असता म्हशीने दिलेले उत्तर ऐकून पत्रकाराच्या आनंदाला पारावार उललेला नाही, असे दिसत आहे. ते म्हणतात ही म्हैस सांगतेय की, लाहोर चांगले वाटत आहे.
त्यानंतर हाफिझ म्हशीला विचारतात की, लाहोरमधील भोजन चांगले आहे की, तुमच्या गावातील भोजन चांगले आहे. या प्रश्नावर उत्तर देताना म्हशीने दिलेले उत्तर ऐकून हाफिझ अजूनच आनंदित होतात. ते सांगतात की, म्हैस म्हणतेय हो लाहोरचं भोजन अधिक चांगलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, एक युझर लिहितो की, हो खरोखरच पाकिस्तान एक आश्चर्यकारक ठिकाण आहे, इथे काहीही होऊ शकते.
सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ८ हजारांहून अधिक लोकांना पाहिले आहे. तसेच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. तसेच या व्हिडीओवरून नेटिझन्स पत्रकार हाफिझ यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. एका युझरने लिहिले की हे तेच पत्रकार आहेत ज्यांचा प्राण्यांच्या मुलाखती घेण्यामध्ये हातखंडा आहे.