सोशल मीडियावर सापांचे अनेक चकीत करणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. यात एका स्कूटीमधून मोठ्या आकाराचा विषारी कोब्रा साप बाहेर येताना दिसतोय. या सापाला पकडण्यासाठी सर्पमित्राने एक अनोखी शक्कल लढवली.
आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. स्कूटरची नंबरप्लेट पाहून, व्हिडिओ तेलंगाणाचा असल्याचे दिसत आहे. दोन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये साप स्कूटरमधून बाहेर येताना दिसतोय. यावेळी त्या सापाला पकडण्यासाठी आलेल्या सर्पमित्राने सापाला पकडण्यासाठी एका पाण्याच्या जारची मदत घेतली.
सर्पमित्र फण काढलेल्या सापाकडे पाण्याचा जार धरतो आणि साप त्या जारमध्ये जातो. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झालेली दिसत आहे. क्लिप ट्विटरवर शेअर करताना सुशांत नंदा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, "असे पाहुणे पावसाळ्यात येतच असतात, पण त्या सापाला वाचवण्यासाठी वापरलेली पद्धत असामान्य आहे." हा व्हिडिओ आतापर्यंत सोशल मीडियावर 20 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.