Viral Video : जगभरात असे अनेक उद्योग आहेत ज्यातून लोक खूप पैसा मिळवतात. लोक पैशांसाठी खतरनाक कामंही करण्यासाठी तयार असतात. निसर्गाने अनेक जीवांना आपल्या सुरक्षेसाठी विष देऊन तयार केलं आहे. साप, काही कोळी, विंचू इत्यादींमध्ये विष असतं. या विषापासून हे जीव आपला बचाव करतात. पण लोक त्यांच्यातूनही आपला फायदा बघतात. साप, विंचू यांच्या विषापासून अनेक औषधं तयार केली जातात. अशात लोक त्यांचं विष गोळा करतात.
साप आणि विंचवाच्या विषाच्या माध्यमातून लोक बरीच कमाई करतात. कारण बाजारात या विषाला फार किंमत मिळते. काही लोक साप आणि विंचू पाळून त्यांचं विष काढतात. या उद्योगातून बरेच पैसे मिळतात. पण हे काम फार घातकही असतं. तरीही लोक धोका पत्करूनही याचा बिझनेस करतात. सोशल मीडियावर विंचवांबाबतचा असाच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात दाखवलं की, विंचवाचं विष कसं काढलं जातं.
विंचवाच्या शरीरातून विष काढणं फार संयमाचं काम आहे. यात बरीच मेहनत आणि वेळही लागतो. त्यात एका विंचवातून फार कमी विष निघतं. अशात हळूहळू करून संयमाने विंचवाचं विष जमा करावं लागतं. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत बघू शकता की, कशाप्रकारे हात सुरक्षित करून विंचवाचं विष काढलं जातं. कारण हे विष क्षणात कुणाचाही जीव घेऊ शकतं. पण जर याचा योग्य वापर केला, तर याचा मनुष्यांना फायदा मिळतो.
विंचवाचं विष फार महागडं विकलं जातं. किंमत जास्त मिळत असल्याने अनेक लोक घातक असूनही ते पाळतात. विंचवाच्या विषाच्या किंमतीबाबत सांगायचं तर त्याच्या एक ग्रॅम विषाची किंमत बाजारात साधारण 7 लाख रूपये इतकी असते. या विषापासून वेगवेगळी औषधं तयार केली जातात.