नवी दिल्ली - पृथ्वीवर निसर्गाचा आविष्कार पाहायला मिळतो. पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सर्वच गोष्टी समजून घेणं मानवासाठी थोडं कठीण आहे. ऑक्सिजन देणारं झाड तुम्ही नेहमी ऐकलं किंवा पाहिलं असेल. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका वेगळ्याच झाडाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हे झाड केवळ ऑक्सिजनच देत नसून तहानलेल्यांची तहान देखील भागवत आहे.
झाड ऑक्सिजनसोबतच पाणीही देताना दिसत आहे. साल कापल्याबरोबर झाडातून पाण्याचा जोरदार प्रवाह वाहू लागतो. या झाडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच व्हायरल झाला आहे. झाडाबद्दल लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जंगलात अनेक झाडं असल्याचं दिसून येतं. एक व्यक्ती झाडाची साल कापून काढताच तिथून पाण्याचा जोरदार प्रवाह वाहू लागतो. पाणी इतकं स्वच्छ आहे की तो ते पिण्यास सुरुवात करतो. या झाडाचं नाव Terminalia tomentosa आहे. ज्याला सामान्यतः क्रोकोडाइल बार्क ट्री असंही म्हणतात. हे झाड भारताच्या काही भागात आढळतं.
झाडाची उंची 30 मीटरपर्यंत असू शकते. विशेष म्हणजे या झाडाच्या खोडामध्ये भरपूर पाणी भरलेलं असतं. जे शुद्ध आणि पिण्यायोग्य आहे. या झाडाला खूप महत्व आहे. वृक्षाच्या वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्यांमुळे काही लोक त्याला बोधीवृक्ष असेही म्हणतात. झाडाचा हा व्हिडिओही लोकांच्या पसंतीस उतरला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 1 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला हजारो लोकांनी लाइकही केलं आहे. या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.