बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक विवाह सोहळे चर्चेचा विषय ठरताना दिसत आहेत. याआधी नवरदेवानं वधूला उचलून घेऊन गेला, वधुला एका बोटीत बसवून तिला सासरी पाठवणारे वधूचे नातेवाईक असे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. पण आता आणखी एक अनोखा किस्सा बिहारमध्ये घडला आहे. बिहारच्या अररिया येथील फुलसारा गावात एका विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हटके प्रकार घडला आहे. (Villagers built bamboo bridge to reached groom for marriage)
गावातील एका लग्नासाठी गावकऱ्यांनी एका रात्रीत बांबूचा पूल तयार केला आहे. पावसाळ्यात गावात येण्यासाठी चांगला रस्ता नव्हता. त्यात काही ठिकाणी पाणी साचल्यानं गावचा संपर्क तुटायचा. यामुळे गावात लग्न समारंभ होत नसत. त्यामुळे गावात लग्न कार्य असलं की गावकरी ते दुसऱ्या गावात आयोजित करत असत. गावकरी बटेश झा यांनी आपल्या लेकीचं लग्न फारबिसगंजच्या रमई गावच्या अमरेंद्र झासोबत ठरवलं. लग्नाची तारीख वगैरे सर्व निश्चित झालं होतं. पण वधू पक्षासमोर नवरदेवाची वरात गावात कशी आणायची असा प्रश्न उपस्थित झाला होता. मग काय गावकऱ्यांनी निश्चिय केला आणि एका रात्रीत बांबूचा पूल तयार केला.
गावात येण्यासाठीच्या एकमेव मुख्य रस्त्यात मध्येच एक ओढा पावसाळ्यात भरुन वाहू लागतो. त्यामुळे गावचा संपर्क तुटतो. याच छोट्याशा ओढ्यावर गावकऱ्यांनी मिळून पूल बांधण्याचा ठरवलं. गावातील एका मुलीचं लग्न रखडणार असल्याचं कळालं आणि संपूर्ण गावातील तरुणांनी पूल बांधण्याचं काम हाती घेतलं. अर्थात एका रात्रीत तयार केलेल्या या बांबूच्या पुलावर कोणतं वाहन नेणं शक्य नसलं तरी नवरदेवाला दुचाकीवरुन मोठ्या थाटात गावकऱ्यांनी गावात आणलं आणि लग्नसोहळा सुरळीतरित्या पार पडला. नवरदेवाची पाहुणे मंडळी देखील वेळेत सोहळ्यासाठी दाखल झाली. गावकऱ्यांनी केलेल्या या कामाचं कौतुक केलं जात आहे.