नवी दिल्ली - मध्यमवर्गीय लोक हे विमानाने प्रवास करतात, परंतु त्यांना मोठ्या सेलिब्रिटी आणि राजकारण्यांप्रमाणं स्वतःच्या खाजगी जेटमध्ये एकटं प्रवास करण्याची इच्छा असते. विमानातील सर्व काही त्यांच्या मालकीचं असलं पाहिजे आणि एक प्रकारे आपणच विमानाचे मालक आहोत असं वाटावं अशी अनेकांची इच्छा असते. सर्वसामान्यांसाठी हे सर्व स्वप्नच असलं तरी एका ब्रिटिश दाम्पत्याचं हे स्वप्न अचानक सत्यात उतरलं. या कपलने एकाही प्रवाशाशिवाय विमान प्रवास केल्याची घटना समोर आली आहे.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनचे 52 वर्षीय केविन मॅकक्यूलियन आणि त्यांची 50 वर्षीय पत्नी समांथा जुलै 2021 मध्ये ग्रीसच्या कॉर्फू बेटावर सुट्टीसाठी गेले होते. ते Ryanair एअरलाइनच्या फ्लाइटने मँचेस्टरला परतणार होते मात्र सुट्ट्या अतिशय चांगला गेल्याने त्यांनी आणखी 1 आठवडा इथेच राहण्याचा निर्णय घेतला आणि Jet2 एअरलाइन्सच्या पुढच्या फ्लाइटने परत जाण्याचं ठरवलं
शनिवारी संध्याकाळी जेव्हा ते फ्लाईट पकडण्यासाठी विमानतळावर पोहोचले तेव्हा त्यांना विमानतळ जवळजवळ रिकामं असल्याचं दिसलं. काहीतरी गडबड आहे असं या जोडप्याला पुन्हा पुन्हा वाटू लागलं. विमानतळावर अजिबात गर्दी नव्हती. त्यांना वाटलं की त्यांच्या फ्लाइटला एकतर उशीर झाला किंवा फ्लाइट निघून गेली आणि ते उशिरा पोहोचले. त्यांनी चेक इन काउंटरवर चौकशी केली असता ते वेळेवर असल्याचं सांगण्यात आलं आणि फ्लाइटही वेळेवर होती.
भीती आणि चिंतेतच ते विमानात पोहोचले. मात्र यानंतरच दृश्य पाहून दोघेही थक्क झाले. एअर होस्टेस, कॅप्टन आणि ते दोघं यांच्याशिवाय फ्लाइटमध्ये दुसरं कोणीही नव्हतं. तेव्हा त्यांना कळालं की कोविडमुळे लोक प्रवास कमी करत आहेत आणि फ्लाइट क्रूला मँचेस्टरला जायचंच होतं, त्यामुळे विमानही रद्द झालं नाही. मँचेस्टर इव्हिनिंग न्यूजशी बोलताना या जोडप्यानं सांगितलं की, त्यांचा हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील सर्वात मजेदार प्रवास ठरला.
पायलटने त्यांना सांगितलं की आपण कुठे पोहोचला हे मी तुम्हाला सांगत राहीन. साडेतीन तासांच्या फ्लाइटमध्ये ते संपूर्ण विमानात आरामात फिरू शकतात, असं स्वातंत्र्यही त्यांना दिलं गेलं. त्यांना खाण्यापिण्याची सोयही मिळाली, मात्र त्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेतले गेले नाहीत. मात्र, नियमांमुळे त्यांना विमानात मास्क घालण्यास सांगण्यात आले. या जोडप्यानं सांगितलं की त्यांना खूप व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली आणि खाजगी जेटमध्ये बसण्याचं त्यांचं स्वप्नही पूर्ण झालं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.