एका भारतीय व्यक्तीने अशी कामगिरी केली आहे, ज्यामुळे देशभरातून त्याचे कौतुक होत आहे. मार्शल आर्ट्समध्ये पारंगत के व्ही सैदालवी यांनी ननचाकू वापरून ६८ नारळ फोडले. यावेळी सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सर्व नारळ लोकांच्या डोक्यावर ठेवल्यावर सैदालवी यांनी फोडले. हा पराक्रम करून सैदालवी यांनी विश्वविक्रम केला आहे. सैदालवी यांनी अवघ्या एका मिनिटात ६८ नारळ फोडले, असे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत वेबसाइटवर असे सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकांच्या डोक्यावर नारळ ठेवण्यात आले होते, जे सैदालवी यांना ननचकूच्या मदतीने फोडावे लागले. अवघ्या एका मिनिटात हा पराक्रम करून त्यांनी आपले नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले. ६८ नारळ फोडून सैदालवी यांनी आपलाच विक्रम मोडला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सैदालवी यांनी इटलीतील 'Lo Show Dei Record' या टॅलेंट शोमध्ये ४२ नारळ फोडले होते. तर यावेळी त्यांनी ६८ नारळ फोडून आपलाच विक्रम मागे टाकला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये सैदालवी नारळ तोडताना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सहा लोक एका वर्तुळात काळे टी-शर्ट घालून बसले आहेत, त्यांच्या डोक्यावर नारळ आहे. तर सैदालवी हे सहा लोकांमध्ये ननचाकू घेऊन उभे आहेत. सैदालवी यांना 'गो' म्हटल्यावर ते पटकन तरुणांच्या डोक्यावर ठेवलेले नारळ ननचाकूने फोडू लागले. ज्या लोकांच्या डोक्यावरचा नारळ फुटला, ते पुन्हा आपल्या डोक्यावर नवीन नारळ ठेवताना दिसून येत आहेत. दरम्यान, सैदालवी हे कर्नाटकातील मद्दूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. हा विक्रम करण्यासाठी त्यांनी ननचाकूचा अधिक चांगल्या पद्धतीने वापर केला.