नवी दिल्ली : इलेक्ट्रिक कार (Electric Vehicles) निर्माता कंपनी टेस्ला (Tesla) आपल्या नावीन्यपूर्ण आणि नवीन तंत्रज्ञानासाठी जगभरात ओळखली जाते. मात्र याचदरम्यान टेस्लाकारच्या (Tesla Car) एका नाराज ग्राहकाने असे पाऊल उचलले की, लोक चक्रावून गेले. दरम्यान, एका नाराज ग्राहकाने 30 किलो डायनामाइट (Dynamite) वापरून आपली टेस्ला कार उडवली. ही घटना फिनलंडच्या किमेनलाकोसो (Kymenlaakso, Finland) भागातील आहे. कारची किंमत सुमारे 50 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
YouTube चॅनेल, Pommijatkat च्या क्रूने रविवारी प्रीमियर झालेल्या टेस्ला कारमधील स्फोटाचे शूटिंग केले. व्हिडिओची सुरुवात फिनलंडच्या बर्फाच्छादित ग्रामीण भागातील दृश्यांनी होते, जिथे काही लोक निर्जन भागात कारवर डायनामाइट लावताना दिसतात. थोड्याच वेळात, एक तरुण येतो, ज्याचे नाव टुमास काटेनेन असे सांगितले जात आहे. त्याने आपल्या 2013 च्या टेस्ला मॉडेल एस (Tesla Model S, 2013) कारचा स्फोट केला आणि ती जळून खाक झाली.
"जेव्हा मी टेस्ला कार घेतली, तेव्हा ती पहिल्या 1,500 किमीपर्यंत चांगली धावली, तोपर्यंत ती एक उत्कृष्ट कार होती. परंतु काही काळानंतर ती खराब झाली, म्हणून मी कारची सर्व्हिस करण्यासाठी सर्व्हिस स्टेशनला पाठवले. जवळपास वर्कशॉपमध्ये एक महिना तयारचे काम सुरु होते आणि शेवटी मला फोन आला की, ते माझ्या कारसाठी काहीही करू शकत नाहीत. संपूर्ण बॅटरी सेल बदलणे हा एकमेव पर्याय आहे", असे व्हिडिओमध्ये कार मालकाने म्हटले आहे. याचबरोबर, "मला सांगण्यात आले होते की यासाठी किमान 20,000 युरो (17 लाख रुपये) लागतील. हे ऐकून मी म्हणालो की मी दुरुस्ती न करता माझी कार घेण्यासाठी येत आहे आणि आता मी ती उडवून देईन", असेही कार मालकाने म्हटले आहे.
दरम्यान, रिपेअरिंग चार्ज ऐकून आणि यासाठी बराच वेळ लागल्यामुळे कार मालक अस्वस्थ झाला. यानंतर त्याने खराब झालेल्या टेस्ला कारचा स्फोट करण्याची योजना केली, त्यासाठी त्याने चांगली योजना आखली. कॅमेरे बसवले, डायनामाईट मागवले, एक दुर्गम भाग निवडला आणि मग क्षणार्धात कारचा स्फोट केला. ही घटना चित्रपटाच्या धर्तीवर चित्रित करण्यात आली आहे. दरम्यान, हा व्हिडिओ 17 डिसेंबर रोजी यूट्यूबवर शेअर करण्यात आला होता, ज्याला आतापर्यंत 3 लाख 30 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.