तुम्ही हॉलिवूडचा ऑस्कर विनिंग चित्रपट ‘Life of Pie’ पाहिला असेल. चित्रपटाचा नायक एक बोटीत वाघासह समुद्रात अडकतो अन् सुरू होतो कठीण आव्हानांनी भरलेला रोमांचक प्रवास. अशीच एक गोष्ट ब्राझीलमधून समोर आली आहे. पण ही गोष्ट चित्रपटाची नसून खरी आहे. 11 दिवस अन्न-पाण्याविना एक माणूस समुद्राच्या मध्यभागी अडकला. या परिस्थितीत एक खराब रेफ्रिजरेटरने त्याला आधार दिला. यामध्ये बसून तो जीवघेण्या शार्कच्या हल्ल्यांपासून आपला जीव वाचवू शकला. याच फ्रिजमधून त्याने सुमारे 450 किमी प्रवास केल्यानंतर तो सुरीनामच्या किनारपट्टीवर पोहचला.
ही एखाद्या चित्रपटातील कथा वाटेल, पण ही खरी गोष्ट आहे. रोमुआल्डो मॅसेडो रॉड्रिग्ज नावाच्या व्यक्तीचा अटलांटिक महासागर पार करतानाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. किनाऱ्यावर पोहोचल्यानंतर रॉड्रिग्जने या फ्रिजला 'देवा'ची उपाधी दिली. या 44 वर्षीय व्यक्तीचा प्रवास जुलैमध्ये उत्तर ब्राझीलमधील ओयापोक येथून सुरू झाला आणि महिन्याभरानंतर तो घरी परतला. त्यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना आपल्या अद्भुत प्रवासाविषयी सांगितले.
नेमकं काय झालं होतं..?रोमुआल्डो फ्रेंच गयानामधील एका बेटावरुन लाकडी बोटीने मासेमारीसाठी समुद्रात उतरला होता. मात्र अचानक वातावरण बिघडले आणि त्याची बोट बुडाली. रोमुआल्डोला पोहता येत नव्हते, पण तो नशीबवान होता की त्याला समुद्रात एक जुना फ्रीज तरंगताना सापडला, कसा बसा तो त्यावर चढला. हे खराब डीप फ्रिज आपला जीव वाचवेल याची त्याला कल्पनाही नव्हती. 11 दिवस तो अन्न-पाण्याविना समुद्रात इकडे-तिकडे भटकला राहिला, यादरम्यान तो खूप अशक्त होत गेला. त्याचे पाच किलो वजन कमी झाले, सूर्यप्रकाशामुळे त्याची त्वचाही खूप जळली. त्याला समुद्रात शिकारीसाठी फिरणाऱ्या धोकादायक शार्क माशांनी खाण्याची भीतीही वाटत होती. मात्र, सुमारे 450 किमीचा प्रवास केल्यानंतर त्याचे प्राण वाचले.
जमिनीवर येताच तुरुंगवाससुरीनामजवळ एका बोटीतून जाणार्या लोकांनी त्याला फ्रिजमध्ये तरंगताना पाहिले आणि त्यांनी त्याचा जीव वाचवला. यादरम्यान त्याचा व्हिडिओ बनवण्यात आला. त्याचे कपडे फाटले होते, भूक आणि तहानने त्याची प्रकृती बिघडली होती. त्याची दृष्टीही गेली होती. लोकांनी त्याला खायला-प्यायला दिले. मात्र तरंगत तो दुसऱ्या देशात गेल्यामुळे आणि त्याच्याकडे कागदपत्रे नसल्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. 16 दिवसांच्या तुरुंगवासानंतर त्याला घरी पाठवण्यात आले. ही गोष्ट एखाद्या चित्रपटाला साजेशी आहे.