नवी दिल्ली - नवरा बायको यांच्यातील भांडणांबाबत तुम्ही रोज ऐकत असाल, छत्तीसगडमध्ये राहणाऱ्या एका महिलेचं तिच्या पतीसोबत भांडण झाले मात्र या भांडणामुळे रेल्वेला ३ कोटींचं नुकसान सहन करावं लागलं आहे. या महिलेचा पती रेल्वेत स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत आहे. नवरा बायको मोबाईलवरून एकमेकांशी भांडत होते, त्याचवेळी कार्यालयातील दुसरा फोन सुरू होता. तेव्हा नवऱ्याने ओके म्हणून बायकोचा फोन ठेवला मात्र हाच ओके दुसऱ्या लाईनवरच्या स्टेशन मास्तरांनी सिग्नलला ओके दिल्याचं समजून घेतला.यानंतर ट्रेन निर्बंध असलेल्या रूटवर गेली. यामुळे रेल्वेचे मोठे नुकसान झाले. पती पत्नीचे हे प्रकरण न्यायालयात सुरू होते तिथे कोर्टाने दोघांच्या घटस्फोटाला मान्यता दिली.
काय आहे प्रकार?
महिलेचा पती विशाखापट्टनम स्टेशनवर मास्तर होते तर पत्नी छत्तीसगडला राहणारी होती. या दोघांचे लग्न हिंदू प्रथेनुसार १२ ऑक्टोबर २०११ साली झाले. लग्नानंतर काही काळात दोघांच्या नात्यात दुरावा आला. महिलेचे अन्य कुणाशीतरी संबंध असल्याचा संशय पतीला आला. पतीसमोरच पत्नी तिच्या प्रियकरासोबत बोलत होती. त्यावरून दोघांमध्ये टोकाचा वाद झाला. त्यात एकेदिवशी स्टेशन मास्तर पती ड्युटीवर होता आणि मोबाईलवरून या दोघांमध्ये काही कारणांवरून भांडण सुरू झाले.
'OK' शब्दामुळे ट्रेन चुकीच्या पटरीवर गेली
ड्युटीवर तैनात असलेल्या स्टेशन मास्तरचे पत्नीसोबत भांडण सुरू होते. त्याचवेळी स्टेशनवरून एक ट्रेन जाणार होती. भांडणावेळी पतीने पत्नीला सांगितलं, मी घरी आल्यावर तुझ्याशी बोलतो, ओके...मात्र दुसऱ्या स्टेशन मास्तरने त्यांचा हा ओके ट्रेनसाठी असल्याचा समज करून घेतला. ओके शब्दामुळे ग्रीन सिग्नल मिळाला आणि ट्रेन चुकीच्या पटरीवर गेली. त्यामुळे रेल्वेला फटका बसला. जवळपास ३ कोटी रुपयांचे रेल्वेचे नुकसान झाले. या प्रकाराची गंभीर दखल घेत रेल्वेने संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित केले.
या प्रकारामुळे नवरा आणि बायको यांच्यातील अंतर आणखीच वाढले. पतीने पत्नीवर आरोप केला की, तिचे इंजिनिअरींग कॉलेजच्या लायब्रेरियनशी संबंध आहेत. त्या दोघांमध्ये शारीरीक संबंधही आहेत. पतीने हा प्रकार सासऱ्यांना सांगितला, त्यानंतर मुलीकडून असे पुन्हा घडणार नाही असं हमी त्यांनी दिली. परंतु कुटुंबाने समजावूनही पत्नी प्रियकराशी बोलत राहिली. पत्नीच्या या वागणुकीमुळे पती त्रस्त झाला. त्याने कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली. त्यानंतर महिलेने पती आणि त्याच्या कुटुंबाविरोधात मानसिक छळ केल्याचा आरोप केला. या प्रकरणात कोर्टाने दोघांची बाजू ऐकून घेत तथ्य पडताळणी करून पत्नीच्या वागणुकीनं पतीचा मानसिक छळ झाल्याचं म्हटलं. त्यानंतर कोर्टाने दोघांच्या घटस्फोटाला मान्यता दिली.