जगभरातून गुन्हे विश्वातील अनेक हैराण करणाऱ्या घटना नेहमीच समोर येत असतात. अनेक घटनांमध्ये बघायला मिळतं की, गुन्हेगार एखादा गंभीर गुन्हा किंवा हत्या करून कुठेतरी फरार होतो आणि अनेक वर्ष त्याला पोलिसही शोधू शकत नाहीत. हे गुन्हेगार आपली आधीची सगळी ओळख पुसून नव्याने जगू लागतात. पण ते म्हणतात ना 'कानून के हाथ बडे लंबे होते है...' असंही काही केसेसमध्ये बघायला मिळतं. म्हणजे बऱ्याच वर्षांनी का असेना गुन्हेगार पोलिसांच्या तावडीत सापडतातच. अशीच एक घटना चीनमधून समोर आली आहे.
2004 मध्ये हत्या करून फरार झालेल्या एका गुन्हेगाराला पोलिसांनी पकडलं आहे. हुबई प्रांतातील ही घटना आहे. जियानयांगच्या जियांगचेंग जिल्ह्यातील एका गावात 22 मे 2004 रोजी जिओ नावाच्या एका व्यक्तीचं शेजारच्या व्यक्तीसोबत भांडण झालं आणि जिओने फावड्याने त्या व्यक्तीच्या डोक्यात वार केला. अशात समोरची व्यक्ती जागीच ठार झाली. आता आपल्या तुरूंगात जावं लागणार या भितीने जिओने पत्नी आणि मुलांना सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला.
जिओ फुजियान प्रांतातील एंक्सी काउंटीच्या डोंगरांमध्ये पळून गेला आणि तिथे सफाई कर्मचारी म्हणून काम करू लागला. त्याने आपली जुनी सगळी ओळख पुसून टाकली. जिओ तब्बल 20 वर्ष मुका आणि बहिरा असण्याचं नाटक करत राहिला. 20 वर्ष जिओने आपल्या परिवाराला कॉन्टॅक्ट केला नाही. दुसरीकडे पोलिसही शांत बसले नाही. ते त्याचा शोध घेत होते.
एका घटनेमुळे तब्बल 20 वर्षांनी जिओ पोलिसांच्या जाळ्यात अडकला. गेल्या महिन्यात एंक्सीमध्ये जिओचं काही स्थानिक लोकांसोबत भांडण झालं होतं. अशात मूकबधीर असलेल्या जिओला पोलिसांनी अटक केली होती. पण काही दिवसांनी त्याला सोडून देण्यात आलं. त्याच्यावर कारवाई करण्यात आली आणि त्याचे फोटो एका नेशनवाइड डेटाबेसमध्ये जमा झाले.
याच महिन्याच्या सुरूवातीला राष्ट्रीय डेटाबेसमधील जुने फोटो बघत असतना पोलिसांना एक फोटो दिसला. मूकबधीर असलेल्या त्या व्यक्तीचा चेहरा एका वॉन्टेड गुन्हेगारासोबत मिळत होता. अशात पोलिसांनी एक टीम पाठवून चौकशी केली. मूकबधीर व्यक्ती सापडल्यावर त्याला पोलिसांना थेट विचारलं की, तू जियांगचेंग जिल्ह्यातील आहेस का? त्याने हो म्हणून उत्तर दिलं.
तेव्हा कुठे जिओने पोलिसांना सगळंकाही सांगितलं. जिओला आपल्या गावी परत आणण्यात आलं आणि इतके वर्ष हत्या करून फरार झालेल्या जिओला पोलिसांनी शोधलं आणि आता तो तुरूंगात आहे. तो जिथे राहत होता तेथील स्थानिक लोकांनी पोलिसांना सांगितलं की, तो गुन्हेगार असेल याचा त्यांना कधीच संशय आला नाही. तो आपलं काम करत होता आणि कुणाशी बोलत नव्हता.