कोलकाता: पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात सध्या अभिनेत्री सनी लिओनीची जोरदार चर्चा आहे. महाविद्यालयांचे प्राध्यापक आणि कुलगुरू संगणकाच्या स्क्रीनकडे लक्ष ठेवून आहेत. त्यांची नजर सनी लिओनीला शोधत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे सनीच्या नावाखाली घोटाळा होऊ नये म्हणून प्राध्यापक आणि कुलगुरू सावध आहेत. गेल्याच वर्षी सनी लिओनीच्या नावाखाली एक प्रवेश अर्ज करण्यात आला होता. विशेष म्हणजे तो अर्ज स्वीकारलादेखील गेला आणि सनीचं पहिल्याच यादीत झळकलं. त्यामुळेच आता महाविद्यालय प्रशासन सतर्क आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये आशुतोष महाविद्यालयात इंग्रजी साहित्याच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान एक मोठा घोटाळा समोर आला. एकानं सनी नावानं बोगस अर्ज दाखल केला. सनीचं नाव मेरिट लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर होतं. सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा झाली. विशेष म्हणजे सनीनं यावर ट्विट करत आपण उत्साहित असल्याचं म्हटलं होतं.
गेल्या वर्षी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महाविद्यालय प्रशासन तेल घालून अर्ज तपासत आहे. गेल्या वर्षी महाविद्यालय, विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं झाली. सनी लिओनीच्या नावानं आलेला बोगस अर्ज त्यावेळी प्रशासनाच्या नजरेतून सुटला. सनीचं नाव थेट मेरिटमध्ये झळकल्यानं महाविद्यालय चेष्टेचा विषय ठरलं. तसा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी प्रवेश अर्ज आणि मेरिट लिस्टची काळजीपूर्वक तपासणी केली जात आहे.