Marriage twist story, mother in law and lost daughter: लग्नाचा विषय आला की घरातील मोठी मंडळी लहानांना विविध सल्ले देत असतात. अरेंज मॅरेजमध्ये दोन्ही बाजूची मंडळी बाहेरून विचारपूस करून आणि पारखूनच स्थळ पक्कं करतात. हल्ली लव्ह मॅरेजचे प्रमाण वाढले असले तरीही किमान नवरा-नवरी एकमेकांना नीट ओळखत असतात. त्यामुळे लग्नाच्या दिवशी फसवणूक किंवा धक्का बसण्याचा प्रसंग फार कमी ओढवतो. पण चीनमधील एका लग्नात मात्र नवऱ्या मुलाच्या आईला लग्नाच्या दिवशी जबर धक्का बसला. आपली होणारी सून ही आपलीच हरवलेली मुलगी आहे, ही बाब लग्नाच्या दिवशी उघड झाली आणि मग बरंच काही घडलं.
कसं उघडकीस आलं सत्य?
लग्नाचा माहोल होता. नवऱ्या मुलाची आई लग्नाची वरात घेऊन नवरीच्या घरी गेली असता, तिथे तिला ही गोष्ट समोर आली. नवरी मुलगी म्हणजेच होणारी सून जेव्हा वरातीच्या स्वागतासाठी दारामध्ये आली त्यावेळी नवऱ्या मुलाच्या आईने नवरीच्या हातावर एक खूण पाहिली. त्यावरून तिला काही जुन्या गोष्टी आठवल्या आणि तिने मुलीच्या घराण्याची चौकशी करायला सुरूवात केली.
नवरी मुलीचे आई-वडील म्हणाले...
वरमाय प्रश्नांची सरबत्ती करू लागली आणि मग काही गोष्टींवरून पडदा पडला. नवरी मुलीच्या आई वडीलांनी सांगितले की आम्हाला ही मुलगी लहान असताना रस्त्याच्या कडेला सापडली होती. त्यामुळे आम्ही तिला दत्तक घेतले आणि लहानाचे मोठे केले. घडलेला प्रकार ऐकल्यानंतर नवऱ्या मुलाच्या आईने २० वर्षांपूर्वी तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आणि त्यावरून हे पक्के झाले की ती मुलगी नवऱ्याच्या आईची हरवलेली मुलगी आहे.
'कहानी में ट्विस्ट'
हा किस्सा येथेच थांबत नाही. त्यापुढे असे समजले की, नवऱ्या मुलाच्या आईने आपली मुलगी हरवल्यानंतर एक मुलगा दत्तक घेतला होता. तोच हा नवरा मुलगा होता. अखेर दोघांनाही दत्तक घेतले असल्याने त्यांच्यात पूर्वीचे कोणतेही नाते नव्हते ही निश्चित झाले आणि मग या दोघांचे लग्न लावण्यात आले.