मुंबई : आजकाल तरुणाई जरा हटके करिअर निवडण्याचा विचार करते. प्रत्येक क्षेत्र विस्तारत गेल्याने नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ लागल्यात. इतरांपेक्षा वेगळ्या वाटेने जाण्यासाठी वेगवेगळे करिअर शोधले जातात. पण जगभरात करिअरचे काही असेही क्षेत्र आहेत, ज्याविषयी तुम्ही या आधी कधी ऐकलंही नसेल. भारतात अशा करिअरची अद्यापही विचार केलेला नाहीए. पण परदेशात अशा विचित्र करिअरना मात्र प्रचंड वाव आहे. त्यामुळे डॉक्टर, वकिल, सीए, इंजिनिअर अशी ठराविक क्षेत्र निवडण्यापेक्षा थोडंसं हटके काहीतरी करायचं असेल तर तुम्हीही अशा विचित्र क्षेत्रांचा करिअर म्हणून विचार करायला काहीच हरकत नाही.
कचरा शोधक
आपल्या येथे कचरा कसाही रस्त्यावर टाकला जातो. चालता-चालता आपण सहज रस्त्यावर कचरा फेकून देतो. मात्र काही देशात रस्त्यावर कचरा फेकणं कायदेशीर गुन्हा आहे. जर्मनीमध्ये तर असं रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी नेमले जातात. तसंच प्रत्येक कचरापेटीवर त्याचं बारीक लक्षही असतं. त्यामुळे या जर्मनीमध्ये कचरा रस्त्यावर पडलेला अजिबात दिसत नाही. आणि पडलेला दिसलाच तरी तो अशा अधिकाऱ्यांच्या सुचनेमार्फत त्वरीत उचलला जातो.
क्राईम सीन क्लिनर्स
आपल्या इथे काही घातपात किंवा अपघात झाला की तिकडे रक्तांचे डाग असेच रस्त्यावर पडलेले दिसतात. स्थानिक जोपर्यंत तो रस्ता स्वच्छ करत नाहीत तोपर्यंत घाण आणि दुर्गंधी अशीच पसरलेली असते. मात्र अमेरिकेत असे रस्ते स्वच्छ करण्यासाठी कर्मचारी नेमले जातात. रस्त्यावर सांडलेल्या रक्तामुळे कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन नागरिकांना होऊ नये म्हणून सरकारी पातळीवरच हे काम केलं जातं. या क्षेत्रात येण्यासाठी खास प्रशिक्षणही दिलं जातं. त्यामुळे अमेरिकेत विद्यार्थी या क्षेत्राचा करिअर म्हणून विचार करतात.
नवरीची करवली
आपल्याकडे करवलीचा मान नवरीच्या बहिणीकडे असतो. पण अमेरिकेत नवरीसाठी खास बाहेरून करवली मागविली जातात. प्रोफेशनल ब्राईडमेड्स असं या क्षेत्राला म्हणतात. अमेरिकेत ज्या पद्धतीने लग्न होतात त्यामानाने नवऱ्या मुलीची संपूर्ण देखरेख करण्याची जबाबदारी या करवलीवर असते. तिचा मेकअप, कपडे या साऱ्या गोष्टींवर या प्रोफेशनल ब्राईडमेड्सचं लक्ष असतं. लग्नात नवरी मुलीला काहीच कमी पडू नये म्हणून या ब्राईडमेड्सना पाचारण्यात येतं.
आणखी वाचा - बाहुबलीच्या या सीनचं अनुकरण करणं तरुणाला पडलं महागात
लाईव्ह मॅनेक्वीन
जर तुम्ही फार वेळ उभं राहू शकत असाल तर लाईव्ह मॅनेक्वीन हे क्षेत्र तुमच्यासाठी फार उत्तम आहे. अमेरिकेत लाईव्ह मॅनेक्वीनचं काम करणाऱ्याला प्रत्येक तासाचे १०० डॉलर मिळतात. एखाद्या दुकानात किंवा कोणत्या कार्यक्रमात लाईव्ह मॅनेक्वीनची गरज भासते. मोठ्या कार्यक्रमांमध्ये काहीतरी हटके करण्याची संकल्पना असले तर अशा मॅनेक्वीनना बोलवण्यात येतं.
बेड टेस्टर
झोपण्यासाठी कोणी पगार देत असेल तर अशी नोकरी कोणाला नकोय. काही देशात बेड टेस्टर कामाला ठेवण्यात येतात. एखाद्या बेडचा रिव्ह्यू घेण्यासाठी बेड टेस्टरना नियुक्त करण्यात येतं. या क्षेत्रात तुम्ही पार्ट टाईम काम करू शकता. पार्ट टाईमने तुम्ही महिन्याला दिडशे ते दोनशे डॉलर हमखास कमवू शकता.
कुत्र्याची विष्ठा उचलणं
परदेशात कुत्र्याची विष्ठा उचलण्यासाठीही वेगळं क्षेत्र असतं. रस्त्यावर पडलेली विष्ठा उचलण्यासाठी खास कामगार ठेवले जातात. कुत्र्याच्या विष्ठेने दुर्गंधी पसरते त्यामुळे खास कामगार नेमले जातात. या क्षेत्रात काम करण्याऱ्याला पॉपर स्कूपर असं म्हणतात.
आणखी वाचा - #BarbieDoll : या खऱ्या बार्बीला सौंदर्यामुळे झालं घराबाहेर पडणं मुश्किल
क्लोथ्स एक्झॉरसिस्ट
आपल्या वॉर्डरोबमध्ये खूप कपडे असतात. त्यातील कित्येक कपडे आपण वर्षानुवर्षे घातलेलेही नसतात. अशाच कपड्याचं वर्गीकरण करण्यासाठी क्लोजेस एक्झॉरसिस्ट नेमले जातात. आपल्याकडे काय ठेवलं पाहिजे आणि काय नाही ते क्लोजेस एक्झॉरसिस्ट अगदी अचूक सांगतात.
प्रोफेशनल्स पुशर्स
मुंबई लोकलमध्ये तुम्ही लटकून प्रवास करणारे पाहिले असतील. जगातल्या प्रत्येक रेल्वे स्थानकांवर अशीच गर्दी असते. पण लटकून प्रवास करणाऱ्यांना आतमध्ये ढकलण्याचं काम प्रोफेशनल्स पुशर्स करतात. जपानमध्ये अशा प्रोफेशनल्स पुशर्सची नियुक्ती केली जाते. त्यांच्या ट्रेनचे दरवाजे बंद असतात त्यामुळे एकही प्रवासी बाहेर लटकू शकत नाही. त्यामुळे बाहेर अडकलेल्या प्रवाशांना ट्रेनमध्ये ढकलण्याची कामगिरी प्रोफेशनल्स पुशर्स यांच्याकडे असते.
डिओड्रंट टेस्टर
आपण एखादा परफ्युम खरेदी करताना त्याची टेस्ट कशी घेतो? हाताच्या पंजावर एखाद-दुसरा स्प्रे मारून वास घेतो. त्याचप्रमाणे परफ्युम बनवणाऱ्या कंपनीत डिओड्रंट टेस्टर नेमले जातात. त्यांच्यावर परफ्युम स्प्रे करून नक्की कसा वास आहे याचा अंदाज घेतला जातो.
सौजन्य - www.scoopwhoop.com