हैदराबाद - वारंगलच्या २ जुळ्या बहिणींची कहाणी आता आणखी रंजक झाली आहे. या दोघींचं लग्न एकाच दिवशी एकाच ठिकाणी झाले. त्यानंतर आता दोन्ही बहिणींनी एकाच हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी मुलांना जन्म दिला आहे. दुग्गोंडीच्या तिम्मपेटा गांवात बोंथू सरैया आणि कोमारम्मा यांच्या ललिता आणि रामा या जुळ्या बहिणींची ही गोष्ट आहे.
आई वडिलांनी १ वर्षापूर्वी ललिताचे लग्न कोलानपल्ली येथील नागराजूसोबत केले होते तर रामाचे लग्न थिम्मपेटा येथील गोलन कुमारसोबत केले होते. योगायोगाने या जुळ्या बहिणींनी १ वर्षानंतर एकाच दिवशी मुलांना जन्म दिला. या घटनेबाबत सर्वत्र चर्चा होताच आमदार पेड्डी सुदर्शन रेड्डी यांनी हॉस्पिटलला येत दोघींच्या प्रकृतीची विचारपूस केली. या दोघी बहिणींना केसीआर किट भेट म्हणून दिली.
या किटमध्ये आवश्यक सामान आणि अन्य गोष्टी असतात, ज्या नवजात बालकांना उपयोगी येतात. बीआरएस आमदाराने महिलांना कल्याण लक्ष्मी चेक दिला. तेलंगणा सरकारची ही अशी योजना आहे ज्या अंतर्गत गर्भवती महिलेला बाळंतपणानंतर आर्थिक मदत दिली जाते. या दोन्ही महिलांची डिलिव्हरी सामान्यरित्या झाली नाही. प्रसुती वेदना वाढल्याने दोघींना ५ दिवसांपूर्वी रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे सामान्य डिलिव्हरी होण्याची वाट पाहिली. डॉक्टरांनी महिलेच्या तपासणीनंतर डिलिव्हरी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही बहिणींची सर्जरीद्वारे डिलिव्हरी करण्यात आली. ३० मार्च रात्री उशीरा दोन्ही महिलांनी मुलाला जन्म दिला.