आपलं रोजचं आयुष्य धकाधकीचं असतं. कधीकधी त्या धावपळीचा, धकाधकीचा उबगही येतो. असं वाटतं की हे सर्व थांबवून छानपैकी आपल्या प्रियजनांबरोबर, मित्रांबरोबर बाहेर फिरायला जावं. गप्पांची मैफल रंगवावी. एन्जॉय करावं. पण अनेकदा ते शक्य होत नाही. आपल्या दैनंदिन कामांना फाटा देऊन ही अशी चंगळ करण्याची प्रथा आपल्याकडे तितकीशी रुजलेली नाही. पण तिकडे युरोपात ही प्रथा आवर्जून पाळली जाते. याला हुगा लाइफस्टाइल असं नाव आहे. हुगा लाइफस्टाइल म्हणजे फार काही नाही. घरीसुद्धा हुगाची वातावरण निर्मिती केली जाऊ शकते. आपल्या प्रियजनांना, मित्र-मैत्रिणींना, आप्तेष्टांना किंवा कोणीच नसेल तर शेजाऱ्यांना बोलवावं. छानपैकी खायला काहीतरी करावं. खाता खाता गप्पाष्टक रंगवावं. गप्पांमध्ये कोणताही विषय वर्ज्य ठेवू नये. ज्यांना मित्रांचं कोंडाळं जमवणं अगदीच शक्य नाही ते घरी हुगाची नुसती वातावरण निर्मितीही करू शकतात. घरी नसेल हुगा शक्य तर बाहेर जाऊनही हा आनंद लुटता येऊ शकतो. कोणताही तणाव न घेता त्या क्षणापुरता आयुष्य जगणं, हे या लाइफस्टाइलचे मुख्य सूत्र आहे. या छोट्याशा ब्रेकनंतर आंबलेलं मन प्रफुल्लित होतं, असं निरीक्षण आहे. संकल्पना आली कुठून? हुगा हा शब्द डेन्मार्कमधून आला. साधारणतः १५००च्या शतकात हुगा हा शब्द वापरला गेला. हुगाची फोड आहे टू हग समवन, म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीला आलिंगन देऊन त्याची वास्तपुस्त करणं. त्याच्याशी चार-दोन घटका गप्पा मारणं, असं यात अध्याहृत असतं. डॅनिश जनतेने या जीवनशैलीला आपलंसं केलं आहे. अलीकडे हुगा जीवनशैलीने जर्मनी, फ्रान्स, स्पेन यांसारख्या युरोपीय देशांमध्ये प्रवेश केला आहे. या देशांमध्ये चक्क हुगा लाइफस्टाइलचे मेळावेही वीकएण्ड्सना भरविले जातात. आपल्याकडे काय? जे जे पाश्चात्य ते ते उदात्त, अशी आपली धारणा आहे. त्यामुळे येत्या काळात हुगा लाइफस्टाइल आपल्याकडे आली तरी त्यात आश्चर्य वाटून घ्यायला नको. न पेक्षा आपल्याकडे सण-समारंभ, लग्न-मुंजी यांच्या निमित्ताने प्रियजनांच्या भेटीगाठी होत असतातच. तीच आपली हुगा लाइफस्टाइल, उगा कशाला पाश्चात्यांचं अंधानुकरण करावं, हाही प्रश्न विचारता येऊ शकतोच म्हणा!
हुगा : टू हग समवन! म्हणजे काय रे भाऊ?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2023 8:13 AM