आजारी पडल्यानंतर प्रत्येक जण डॉक्टरांचा सल्ला, तसंच आवश्यक तपासण्या करून घेतो. आजाराच्या लक्षणांनुसार डॉक्टर औषधं (Medicine) देतात. डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनवर (Prescription) लिहून दिलेली औषधं आपण मेडिकल दुकानातून खरेदी करतो. त्यात टॅब्लेट (Tablet) अर्थात गोळ्यांचाही समावेश असतो. या गोळ्यांकडे तुम्ही कधी निरखून पाहिलं आहे का? औषधाच्या गोळ्या विविधरंगी आणि विविध आकाराच्या असतात. तसंच काही गोळ्यांच्या मधोमध एक रेषादेखील (Line) असते. या रेषेमागे एक अर्थ दडलेला असतो.
औषधाच्या गोळ्या गोलाकार, दंडगोलाकार, तसंच अन्य आकर्षक आकारांत उपलब्ध असतात. कॅप्सुल (Capsule) हादेखील यातलाच एक प्रकार आहे. लांब आकाराच्या गोळ्यांच्या मधोमध एक रेषा असते. ही रेषा केवळ डिझाइनच्या हेतूने दिलेली नसते. या सरळ रेषेला Debossed Line असं म्हणतात. परंतु, ही रेषा सर्वच गोळ्यांवर नसते.
टीव्ही 9 हिंदीच्या रिपोर्टनुसार याविषयी माहिती देताना बिहारमधले फार्मासिस्ट चंदन कुमार यांनी सांगितलं, की गोळ्यांवर मधोमध असलेल्या रेषेचा अर्थ असा, की ही गोळी मधोमध तोडून तिचा अर्धा डोस तुम्ही घेऊ शकता. काही गोळ्या अधिक पॉवरच्या असतात. त्यामुळे त्या गोळीचा निम्मा डोस कळावा, यासाठी ही रेषा आखलेली असते. अशा एखाद्या गोळीचा निम्मा डोस घेतल्यानंतर उरलेली अर्धी गोळी नीट ठेवावी. त्या अर्ध्या गोळीला हवा किंवा घाण लागली असेल, तर ती गोळी घेणं टाळावं. डॉक्टरांच्या सल्ल्याविना कोणतीही गोळी अथवा कॅप्सूल घेऊ नये.
महत्त्वाचं म्हणजे ज्या गोळ्यांवर Debossed Line नसते, त्या गोळ्या तुम्ही मनाप्रमाणे तोडून अर्धा डोस (Half Dose) डॉक्टरांच्या सल्ल्याविना घेऊ शकत नाही. ज्या गोळीवर Debossed Line असते, ती गोळी तुम्ही अर्धी तोडून निम्मा डोस घेऊ शकता. उदाहरणार्थ, तुमच्याकडे 500mg ची गोळी आहे. परंतु, डॉक्टरांनी तुम्हाला 250 mgचा डोस घेण्यास सांगितला असेल तर 500 mg ची गोळी मधोमध असलेल्या रेषेवर तोडून ती निम्मीच घ्यावी. याचाच अर्थ 500 mg ची एक गोळी मधोमध तोडल्यानंतर तिचे दोन तुकडे प्रत्येकी 250 mg पॉवरचे होतात. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार 250 mg म्हणजेच निम्मी गोळी तुम्ही घेऊ शकता. परंतु, असं करताना गोळीचे तुकडे काळजीपूर्वक करावेत. कोणतीही गोळी घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.