Milestone Colour : रोडने प्रवास करताना तुम्ही अनेकदा 'माइल स्टोन' म्हणजेच मैलाचे दगड तुम्ही अनेकदा पाहिले असतील. या दगडांवर एखाद्या ठिकाणाचं अंतर आणि त्या ठिकाणाचं नाव दिलेलं असतं. या दगडांच्या वरच्या भागाला पिवळा, हिरवा, काळा, निळा आणि केशरी रंग दिलेला असतो. तर दगडाच्या खालच्या भागाला पांढरा रंग दिलेला असतो.
पण तुम्हाला माहीत आहे का? माइल स्टोनला असे वेगवेगळे रंग का दिले जातात? अनेकदा हायवे किंवा एखाद्या गावातून जाताना तुम्ही हे दगड पाहिले असतील. पण त्यावर लिहिलेल्या अंतराशिवाय आणि गावांच्या नावांशिवाय दुसऱ्या गोष्टींवर लक्ष दिलं नसेल. मात्र, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, हे वेगवेगळे रंग फार कामाचे असतात. यांचा अर्थ फार कमी लोकांनाच माहीत असेल.
जर रस्त्यावरून जात असताना तुम्हाला असा दगड दिसला ज्याच्या वरच्या भागाला पिवळा रंग दिला असेल, तर समजून घ्या की, तुम्ही नॅशनल हायवे म्हणजेच राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत आहात.
जेव्हा तुम्हाला रस्त्याच्या कडेला हिरव्या रंगाचा माइल स्टोन दिसला तर समजा की, तुम्ही राष्ट्रीय महामार्गावर नाही तर राज्य महामार्गावर प्रवास करत आहात.
अनेकदा तुम्ही माइल स्टोनच्या वरच्या भागाला काळा किंवा निळा रंग दिलेला पाहिला असेल. हा रंग दिसला तर समजा की, तुम्ही एखाद्या मोठ्या शहरात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आले आहात.
तसेच तुम्हाला जर रस्त्याच्या कडेला केशरी रंगाची पट्टी असलेला माइल स्टोन दिसला तर समजा की, तुम्ही एखाद्या गावात आलात किंवा गावाच्या रस्त्याने प्रवास करत आहात.