टिकटॉकवर (TikTok) अनेक आव्हानात्मक (चॅलेंज) व्हिडीओ व्हायरल (TikTok Viral Video) होत आहेत. अशा व्हिडीओंचा ट्रेंड सोशल मीडियावर जास्त पाहायला मिळतो. मात्र, एका चॅलेंज व्हिडीओमुळे मुलांच्या आई-वडिलांची झोप उडाली आहे. या व्हिडिओला सर्वात धोकादायक चॅलेंज म्हटले जात आहे. या चॅलेंजचे नाव आहे, स्कल ब्रेकर चॅलेंज(Skull breaker challenge). टिकटॉकवर अशा चॅलेंजचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हे चॅलेंज सर्वात आधी परदेशात सुरु झाले, आता भारतातील युजर्स सुद्धा करत आहेत.
काय आहे, स्कल ब्रेकर चॅलेंज?हा चॅलेंज व्हिडिओ करण्यासाठी तीन जणांची आवश्यकता असते. सुरुवातीला पहिला व्यक्ती हवेत उडी मारतो. त्यानंतर तिसरा व्यक्ती सुद्धा असेच करतो. ज्यावेळी दुसरा व्यक्ती उडी मारतो. त्यावेळी पहिला आणि तिसरा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पाय मारून पाडतो. दोन्ही पाय हवेत असल्यामुळे दुसरा व्यक्ती थेट डोक्यावर पडतो. त्यामुळे याचे नाव स्कल ब्रेकर चॅलेंज ठेवण्यात आले आहे. डोक्यावर पडल्यामुळे अनेकजण बेशुद्ध झाले आहेत, तर काही जणांची डोक्यावर पडल्यामुळे मानेची हाडे तुटली आहेत.
असे चॅलेंज व्हिडीओ जास्तकरून तरुण युजर्स करत आहेत. व्हिडीओ तयार करतेवेळी जखमी झाल्यामुळे अनेक तरुण मुलांचे आई-वडील चिंतेत आहेत. तसेच, काहींच्या आई-वडिलांनी असे चॅलेंज व्हिडीओ करू नका, असे आवाहन ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करून करत आहेत.
ट्विटरवर सिमी आहुजा यांनी चॅलेंजचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तरूण पडल्यामुळे बेशुद्ध झाला आहे. तसेच, त्यांनी कॅप्शनही लिहिली आहे. यामध्ये "स्कल ब्रेकर चॅलेंज ट्रेंडिंग आहे. आपल्या मुलांना आणि आई-वडिलांना आवश्य दाखवा आणि सांगा की, किती धोकादायक आहे. यामुळे हाडे मोडू शकतात आणि गंभीर जखम होऊ शकतो."
हा पहिलाच चॅलेंज व्हिडीओ नाही, ज्यामुळे आई-वडील चिंतेत आहेत. टिकटॉकवर किकी चॅलेंज सुद्धा व्हायरल झाले होते. ज्यामध्ये चालत्या कारमधून उतरून डान्स करण्याचे चॅलेंज होते. या चॅलेंजमध्ये अनेकजण जखमी झाले होते.