Wheelless Bicycle: 'सायकल', हे वाहतुकीचे सर्वात सोपे आणि स्वस्त साधन मानले जाते. सायकल पायाच्या सहाय्याने चालवली जाते. पूर्वी सायकल चालवण्यासाठी खूप ताकत लावावी लागायची, पण कालांतराने गिअरवाल्या सायकल आल्या. सध्या तंत्रज्ञान एवढे पुढे गेले आहे की, बाजारात इलेक्ट्रिक सायकलदेखील उपलब्ध आहेत. पण, तुम्ही कधी चाके नसलेल्या सायकलला चालवले आहे का? हे वाचून थोडं विचित्र वाटेल, पण एका व्यक्तीने चाकांशिवाय चालणारी सायकल बनवली आहे.
कोणी बनवली ही सायकल?साधारणपणे सर्व सायकलला दोन चाके, सीट, पेडल्स आणि हँडलबार असतात. यातही चाक सोडून सर्वकाही इतर सायकलप्रमाणेच आहे. इंजिनीयर आणि युट्यूबर Sergi Gordiev याने ही सायकल तयार केली आहे. सर्जी आपल्या कल्पनेच्या जोरावर वेगवेगळ्या प्रकारच्या सायकल बनवत राहतो. ही आगळीवेगळी सायकल बनवण्याची संपूर्ण प्रोसेस त्याने यूट्यूबवर अपलोड केली आहे.
चाकांशिवाय सायकल कशी बनवली?या सायकलला चाक नसले तरी ती फिरणारा रबराचा पट्टा लावला आहे. हाच पट्टा सायकलला पुढे जाण्यास मदत करतो. चाकांऐवजी व्हील बेल्टचे दोन सेट वापरण्यात आले आहेत. इंजिनियरने नेहमीच्या सायकलची साखळी या बेल्टला बसवली आहे. लष्कराच्या टँकमध्ये वापरल्या जाणार्या तंत्रज्ञानावर हे चाक तयार करण्यात आले आहे.
पेडलिंग केल्यावर साखळी फिरते आणि त्यामुळे हे रबर बेल्ट फिरुन सायकल पुढे सरकते. कोणत्याही सामान्य सायकलप्रमाणेच ही सायकल चालवता येते. पण, या सायकलचा वेग इतर सायकलपेक्षा खूप कमी आहे. पण, यात टायर पंक्चर होण्याची कोणतीही भीती नाही. इंजिनीअरने ही सायकल कशी तयार केली, ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता.