ऑनलाइन लोकमत
आग्रा, दि. २० - पैशांचा पाऊस पडल्याचे स्वप्न अनेकांना पडतात...अशा व्यक्तींचे स्वप्न शनिवारी वृंदावनमध्ये पूर्ण झाले व यामागे कोणा दैवीशक्तीचा हात नव्हता तर एका माकडाने हा पैशांचा पाऊस पाडला होता.
मुंबईत राहणा-या हेमवती सोनकर या त्यांच्या कुटुंबासह वृंदावन येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या. देवदर्शन आटपून सोनकर कुटुंबीय वृंदावनच्या बाजारपेठेत खरेदीसाठी आले होते. या दरम्यान एका माकडाने सोनकर यांच्या हातातील पर्स हिसकावली व तिथून धूम ठोकली. काही क्षणांनी हा माकड दुकानावर जाऊन बसला व त्याने पर्स उघडून बघितली. पर्समधील खाद्यपदार्थ घेऊन पर्स सोडून असे सोनकर कुटुंबीयांना वाटले होते. मात्र माकडाने त्यांचा अपेक्षाभंग केला. त्याने सोनकर यांच्या पर्समधील ५०० रुपयांच्या नोटांचे तीन बंडल बाहेर काढले व त्या नोट्या हवेत भिरकावायला सुरुवात केली. माकडाने घडवेल्या या पावसाचा 'लाभ' घेण्यासाठी सर्वांचीच धावाधाव सुरु झाली. यातील काही इमानदार मंडळीनी त्यांच्या हाती लागलेल्या नोटा सोनकर कुटुंबीयांना परत केल्या. सोनकर यांच्या पर्समध्ये तब्बल दिड लाख रुपये होते. यातील किती रक्कम परत मिळाली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
सोनकर कुटुंबीयांचा त्रास यावरच थांबला नाही. सोनकर यांची मोठी मुलगी खाली पडलेल्या नोटा गोळा करत असतान एका भूरट्या चोरट्याने त्यांच्या खिशातील मोबाईलही काढून घेतला. माकडाच्या या कृत्यामुळे सोनकर कुटुंबीय तिथून स्वघरी परतण्याच्या बेतात आहे.