नुकताच फ्रेन्डशिप डे पार पडला. सगळ्याच मित्रांनी हा दिवस सेलिब्रेट केला असेल. सगळ्यांच्याच जीवनात एक तरी मित्र असतो. जो चांगल्या-वाईट दोन्ही स्थितीत सोबत असतो. पण जेव्हा जगभरातील लोक फ्रेन्डशिप डे साजरा करत होते तेव्हाच मैत्रीच्या या नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली. जी वाचून तुम्हालाही धक्का बसेल.
इंडोनेशियातील सुलावेसीच्या मुना रेजन्सी भागातील ही घटना घडली. इथे दोन मित्रांसोबत आधी कोंबडी आली की, अंडे? या विषयावरून वाद झाला. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण दोघांमधील वाद इतका वाढला की, एका मित्राने दुसऱ्यावर चाकूने १५ वेळा सपासप वार केलेत. ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
इंडिपेंडेंट वेबसाईटच्या वृत्तानुसार, दोन मित्र सोबत बसून दारू प्यायले. मग दोघांमध्ये या गोष्टीवरून वाद पेटला की, आधी कोंबडी आली की अंडे? वाद चांगलाच पेटला आणि बघता बघता दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली.
झालं असं की, डीआर नावाच्या व्यक्तीने मित्र कादिर मार्कस याला दारू पिण्यासाठी बोलवलं. जेव्हा दोघेही नशेत टल्ली झाले तेव्हा डीआरने कादिरला विचारलं की, आधी कोंबडी आली की अंडे? थोडा वेळ दोघेही यावर चर्चा करतात, विचार करतात. पण कुणालाही एकमेकांचा उत्तर पटत नाही. अशात वाद वाढत असल्याने मार्कस तिथून जाण्याचा प्रयत्न करतो. पण डीआर रागाच्या भरात कादिरवर चाकूने १५ वेळा वार करतो. ज्यात त्याचा मृत्यू होतो.
आधी कोंबडी की अंडे?
तुम्हीही तुमच्या मित्रांसोबत या गोष्टीचा विचार केलाच असेल की, आधी कोंबडी आली की अंडे? वर्षानुवर्षे हा प्रश्न विचारला जात आहे. ज्यावर वेगवेगळे दावेही करण्यात आले. पण आता वैज्ञानिकांचा दावा आहे की, त्यांनी या प्रश्नाचं उत्तर शोधलं आहे.
ब्रिस्टल विश्वविद्यालयातील अभ्यासकांनुसार, आधुनिक पक्षी आणि जीवांच्या सुरूवातीच्या पूर्वजांनी अंडी देण्याऐवजी पिल्लांना जन्म दिला असेल. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, हजारो वर्षाआधी कोंबड्या आज आहेत अशा नव्हत्या. त्या अंडी नाही तर पिल्लांना जन्म देत होत्या. त्यानंतर त्यांच्यात सतत वेगवेगळे बदल होत गेले. पिल्लांना जन्म देणाऱ्या कोंबड्यांमध्ये अंडी देण्याची क्षमता विकसित झाली. यातूनच हे सिद्ध होतं की, आधी अंडे नाही तर कोंबडी आली.