विमानात एकदा तरी प्रवास करावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. तुमच्यापैकी अनेकांनी विमानात प्रवासही केला असेल. प्रवास केला नसेल तरी कमीत कमी विमान तरी पाहिलं असेल. तुम्ही पाहिलं असेल की, सगळ्याच नाही पण जास्तीत जास्त विमानांचं रंग पांढराच असतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, विमानांचं रंग पांढराच का असतो? कदाचित याकडे तुमचं लक्ष गेलं नसेल.
काय आहे कारण?
विमानाचा रंग पांढरा असण्यामागील सर्वात मोठं कारण वैज्ञानिक आहे. पांढऱ्या रंगाने विमानाला सूर्यकिरणांपासून वाचवलं जातं. पांढरा रंग हा उष्णतेपासून वाचवतो. रनवेपासून ते आकाशापर्यत विमान नेहमीच कडक उन्हातच राहतात. रनवे असो वा आकाश विमानांवर सूर्यकिरणे नेहमीच थेट पडतात. सूर्याची किरणं इंफ्रारेड असतात. ज्यामुळे विमानाच्या आत भयंकर उष्णता निर्माण होऊ शकते. अशात विमानाचा रंग पांढरा ठेवून विमान उष्णतेपासून वाचवलं जातं. पांढरा रंग सूर्याच्या किरणांना ९९ टक्के रिफ्लेक्ट करतो.
आणखी एक कारण
विमानाचा रंग पांढरा असल्याने कोणत्याही प्रकारचा क्रॅक किंवा भेग सहजपणे दिसून येते. जर विमानाचा रंग पांढऱ्या ऐवजी दुसरा असेल तर भेगा, क्रॅक लपले जातील. अशात पांढरा रंग विमानाच्या मेंटेनन्स आणि निरीक्षणासाठी फायदेशीर ठरतो.
पांढऱ्या रंगाचा असाही फायदा
विमानाचा रंग पांढरा ठेवण्याचं आणखी एक मोठं कारण आहे. ते म्हणजे इतर सर्व रंगांच्या तुलनेत पांढऱ्या रंगांचं वजन फार कमी असतं. पांढरा रंग लावल्याने विमानाचा भार जास्त वाढत नाही. जे आकाशात उडण्यासाठी फार गरजेचं आहे. तेच इतर कोणत्या रंगाचा वापर केल्याने विमानाचं वजन वाढू शकतं. अलिकडे काही विमानांचे रंग पांढरा नसून वेगळेही असतात.