‘अटक मटक चवळी चटक, उंची वाढवायची, तर झाडाला लटक’.... ज्यांची उंची कमी आहे, जे बुटके आहेत, त्यांच्यावर हा ‘फिशपाँड’ म्हणा, टोमणा म्हणा, नेहमी मारला जातो. एकूण काय, तर आपण फार बुटके, ठेंगू असू नये, यासाठी प्रत्येकाची धडपड असते. ‘वयात’ आल्यावर आपली उंची कमी आहे, आता ती फार वाढणं अशक्य आहे, हे लक्षात आल्यावर तर अनेक जण उंची वाढवण्याच्या पाठीमागे लागतात. त्यासाठी व्यायाम करण्यापासून, पुलअप्स काढण्यापासून ते ‘उंचीवाढ वर्गांना’ जाण्यापर्यंत अनेक कसरती करतात...
याबाबतीत नेदरलॅण्ड्स हा देश मात्र अतिशय सुदैवी आहे. जगातल्या सर्वाच उंच लोकांचा देश म्हणून या देशाची ख्याती आहे. पण, गेल्या काही वर्षांत मात्र या देशातील लोकांची उंची कमी कमी होत चालल्याचं निदर्शनास येत आहे. त्यामुळे नेदरलण्ड्समध्ये चिंता व्यक्त केली जात असली, तरी अजूनही या देशातील लोकांची सरासरी उंची इतर देशांतील लोकांपेक्षा जास्तच आहे. यासंदर्भाचा एक अभ्यास सांगतो, गेल्या चार दशकांपासून डच लोकांची (नेदरलॅण्ड्सच्या लोकांना डच असं म्हटलं जातं.) उंची हळूहळू कमी होत आहे. त्यात पुरुष आणि महिला; दोघांचाही समावेश आहे.नेदरलॅण्ड्स सरकारच्या संख्याशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार त्यांची ताजी आकडेवारीही या वास्तवाला पुष्टी देते आहे. डच माणसांची उंची सरासरी सहा फूट आहे. २०२०मध्ये करण्यात आलेल्या पाहणीनुसार १९ वर्षीय तरुणाची उंची सुमारे सहा फूट (१८२.९ सेंटीमीटर) आहे, तर त्याच वयाच्या तरुणींची उंची पाच फूट सहा इंच (१६९.३ सेंटीमीटर) आहे. नेदरलॅण्ड्स सरकारनं १९ ते ६० वर्षे वयोगटातील तब्बल सात लाख १९ हजार लोकांची पाहणी केली. येथील लोकांची उंची अगोदर वाढत होती, काही काळ ती स्थिर राहिली आणि आता ती पुन्हा कमी कमी होत आहे.
१९८०च्या तुलनेत २००१ मध्ये डच पुरुषांची उंची सरासरी एक सेंटीमीटर तर महिलांची उंची १.४ सेंटीमीटरने कमी झाली आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार गेल्या चाळीस वर्षांत डच लोकांचं परदेशात आणि परदेशी लोकांचं नेदरलॅण्ड्समध्ये जे स्थलांतर झालं, त्याचा हा परिणाम असू शकतो. परदेशातून आलेल्या तुलनेनं बुटक्या पुरुषांपासून झालेली मुलं उंचीनं कमी जन्मलेली असू शकतात. पण अर्थातच त्यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही आणि डच लोकांची उंची घटण्याचं तेच एकमेव कारण आहे, असंही नाही.
आई आणि वडील, दोघांचाही जन्म नेदरलॅण्ड्समध्येच झालेला असला, इतकंच काय, आजी-आजोबांचा जन्मही तिथलाच असला तरीही या कुटुंबातील मुलांची वाढ तुलनेनं खुंटलेलीच असल्याचं आढळून आलं आहे. नवरा - बायकोतील दोघांपैकी एकानेही स्थलांतर केलेलं नसलं किंवा त्यांच्यातील एकही जोडीदार ‘परदेशी’ नसला, तरीही मुलांची उंची घसरत असल्याचंही संशोधकांना आढळून आलं आहे. हा ‘चमत्कार’ कसा काय होतोय, याबद्दल सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे. त्याबद्दल आणखी वेगळी थिअरीही मांडली जात आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ ग्रोनिनजेनच्या ‘बिहेव्हिअरल ॲण्ड सोशल सायन्सेस”चे प्रा. डॉ. गर्ट स्टल्प यांचं यासंदर्भात म्हणणं आहे, डच लोकांची सरासरी उंची घटण्यात कोणताही एकच घटक कारणीभूत नाही. २००७मध्ये अर्थव्यवस्था अचानक मोडकळीस आली होती, त्याचा लोकांच्या जीवनमानावर झालेला परिणामही काही प्रमाणात कारणीभूत असू शकतो. आर्थिक ऐपत, आवक कमी झाली, म्हणजे आपोआपच त्याचा परिणाम गरीब, सामान्य कुटुंबांवर आणि त्यांच्या मुलांवर होतो. समाजातील आर्थिक दरी रुंदावते. त्याचा परिणाम त्यांच्या अख्ख्या आयुष्यावरच पडतो. जे गरीब असतात, त्यांची शारीरिक वाढ, उंची खुंटते, हे तर विज्ञानानेच सिद्ध केलं आहे. आहारावरही वाढ अवलंबून असते.
गेल्या काही वर्षांत अमेरिकन लोकांच्या आहारात फास्ट फूड आणि जंक फूडचा समावेश वाढल्यानं त्यांच्याही वाढीवर परिणाम झालेला दिसून येत आहे. त्यांची वाढ वरच्या दिशेने होण्याऐवजी आडव्या दिशेनं होण्याचं प्रमाण वाढलं आहे. चुकीचा आहार, जास्त कॅलरीयुक्त पदार्थ खाणं, अन्नात कमी जीवनसत्व असणं, याबरोबरच दूध, दह्यासारख्या पदार्थांचं आहारातून उच्चाटन होणं, याचाही परिणाम लोकांच्या सरासरी उंचीवर होतो आहे, असं संशोधकांचं म्हणणं आहे.
बापरे, उंचीवाढीचा वेग इतका?१९८०पर्यंत डच नागरिकांची ससरासरी उंची वाढत गेली, त्यानंतर मात्र ती कमी कमी होत गेली, असं अभ्यास सांगतो. १९३०मध्ये जन्म झालेल्या डच पुरुषाची सरासरी उंची पाच फूट नऊ इंच (१७५.६ सेंटीमीटर) होती. १९८०मध्ये जन्म झालेल्या पुरुषांची सरासरी उंची सहा फुटापर्यंत (१८३.९ सेंटीमीटर) वाढली. त्याचवेळी १९३०मध्ये जन्मलेल्या स्त्रियांची सरासरी उंची पाच फूट पाच इंच (१६५.४ सेंटीमीटर) होती. पण, १९८०मध्ये जन्म झालेल्या स्त्रियांची सरासरी उंची पाच फूट सात इंचापर्यंत (१७०.७ सेंटीमीटर) वाढली. म्हणजेच या पन्नास वर्षांत पुरुषांची सरासरी उंची ८.३ सेंटीमीटरनं, तर स्त्रियांची उंची ५.३ सेंटीमीटरनं वाढली.