लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट असते. लग्नाचे भन्नाट किस्से, व्हिडीओ, फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही जण प्रेमात पडलेल्या व्यक्तीशी लग्न करतात. पण तुम्हाला जर कोणी मगरीशी लग्न करत असल्याचं सांगितलं. तर सुरुवातीला तुमचा विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. मेक्सिकोमध्ये एक हटके घटना घडली आहे. सॅन पेड्रो हुआमेल्युलाचे महापौर विक्टर ह्यूगो यांनी एका मगरीशी विधीवत लग्न केलं आहे.
लग्नाला हजारो लोक उपस्थित होते. या लग्नातील सर्व विधी वराच्या नातेवाईकांकडून केले जातात. पर्यावरण, मानव आणि प्राणी यांच्यातील नाते सांगणे, हा या विवाहामागचा मुख्य हेतू आहे. मगरीशी लग्न करणं ही मेक्सिकोमधील 1789 पासून चालत आलेली जुनी परंपरा आहे. असे मानले जाते की असे केल्याने शहरात कधीही वाईट घडत नाही आणि देवाकडून आपल्याला हवे असेल ते सर्व काही मिळते, अशीही येथील मान्यता आहे.
बहुतेक लोक केवळ चांगला पाऊस आणि अधिक मासे मिळावेत यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करतात. महापौरांनीही याच हेतूने हा विवाह केला. मगरीला पांढर्या लग्नाच्या पोशाखात वधूप्रमाणेच तयार केले जाते. त्यानंतर स्थानिक नेते तिच्याशी लग्न करतात आणि स्वतःला दैवी पुरुष समजतात. याच दरम्यान, ते मगरीला किस देखील करतात. यावेळी मगरीचे तोंड कापडाने बांधलेले असते जेणेकरून ती वराला कोणत्याही प्रकारे इजा करू शकणार नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.