Daughter files case against mom dad: जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना कुठल्या ना कुठल्या गोष्टीबद्दल तक्रार असते. काही लोकांना तर जगण्याचा अर्थ शोधावासा वाटेपर्यंत कंटाळा येतो. अनेक मुलांना आपल्या आई-वडीलांचाबद्दल राग किंवा तक्रारी असतात. पण तुम्हाला जर कुणी असं सांगितलं की, एका मुलीने तिच्या परवानगी शिवाय आई-वडीलांना तिला जन्म दिला म्हणून त्यांच्यावरच केस ठोकली आहे तर... ही गोष्ट ऐकायला विचित्र वाटत असली तरी हे खरंच घडलं आहे. 'तुम्ही माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?' या कारणामुळे तिने आपल्या पालकांविरोधात खटला दाखल केल्याचा दावा केला आहे.
indy100च्या अहवालानुसार, न्यू जर्सी येथील कॅस थियाझ नावाच्या महिलेचा दावा आहे की तिने तिच्या पालकांविरुद्ध खटला दाखल केला आहे कारण त्यांनी तिच्या परवानगीशिवाय तिला जन्म देण्याचा गुन्हा केला आहे. थियाज म्हणाली, मी माझ्या आई-वडीलांना न्यायालयात खेचले आहे कारण मला माहीत नव्हते की मी मोठी झाल्यावर मला काम करून उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. थियाज टीकटॉकर आहे. त्यामुळे तिच्या फॉलोअर्ससमोर तिने या गोष्टी सांगितल्या तेव्हा ही सारी मस्करी आहे असा फॉलोअर्सचा गोंधळ झाला. पण नंतर तिने याबद्दल कायदेशीर बाबींचा उल्लेख केल्यावर नेटकरीही थक्क झाले.
ती महिला स्वत: एक आई आहे पण...
विशेष म्हणजे थियाज ही स्वतः देखील एक आई आहे. एका मुलाची आई असण्याबाबत प्रश्न उपस्थित झाल्यावर तिने सांगितले की ते मूल दत्तक घेतले आहे. या महिलेचे म्हणणे आहे की मुल होणे हे अयोग्य आहे. पण जेव्हा तुम्ही मूल दत्तक घेता तेव्हा ती गोष्ट वेगळी असते. कारण त्यावेळी ते मूल या जगात आलेले असते. उलट मुलाची जबाबदारी पार पाडून एक चांगला माणूस होण्याचा तुमचा प्रयत्न असतो.