एकविसाव्या शतकात जग जवळ आलं आहे, लहान झालं आहे हे आपण नेहमीच ऐकतो. पण म्हणजे नेमकं काय झालं आहे, कशामुळे, हे एका शब्दात सांगा असं म्हटलं तर बहुतेक सगळे जण एकच उत्तर देतील, ते म्हणजे स्मार्टफोन्स ! हातात स्मार्टफोन असलेला जगातला प्रत्येक माणूस आज एकमेकांशी जोडलेला आहे. आणि एकमेकांना जोडण्याचं हे काम केलं आहे ते सोशल मीडियाने. आज हातात स्मार्टफोन आणि त्यात पुरेसा डेटापॅक असणारा कोणीही माणूस त्याचं म्हणणं एका क्षणात लाखो करोडो लोकांपर्यंत पोचवू शकतो. त्याला भाषेचं, देशाचं, धर्माचं, लिंगाचं असं कुठलंही बंधन आता उरलेलं नाही.
आज चांगला कन्टेन्ट देणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सना लाखो करोडो फॉलोअर्स आहेत. हे मार्केट इतकं मोठं झालं आहे की हे इन्फ्लुएन्सर्स अनेक वेळा बाजारपेठेची दिशा ठरवू शकतात. या इन्फ्लुएन्सर्सना त्यांनी निर्माण केलेल्या कंटेन्टमधून खूप पैसेही मिळतात. इतके, की अनेक जणांचा मूळ व्यवसायच यू-ट्यूबवर व्हिडीओ बनवून टाकणे हा झाला आहे. अर्थात व्ह्लॉग बनवून जर पुरेसे पैसे कमवायचे असतील तर ते व्हिडीओ लोकांनी मोठ्या प्रमाणात बघितले पाहिजेत. त्यासाठी लोकांना ते आवडले पाहिजेत. लोकांना कुठले व्हिडीओ आवडतात हे जर बघितलं तर असं दिसतं की कौटुंबीक जीवनाचे व्हिडीओज, त्यातही ज्यात लहान मुलं असतील असे व्हिडीओज लोकांना बघायला सामान्यतः आवडतं.
एखादं कुटुंब कसं जगतं, कुठे फिरायला जातं, मुलं प्रवास कसा करतात, तिथे जाऊन ते काय खातात, त्यांना काय आवडतं, काय आवडत नाही अशा गोष्टींचे व्हिडीओ अनेक लोक पोस्ट करतात आणि ते मोठ्या प्रमाणात बघितलेही जातात. हे व्हिडीओ करणाऱ्यांना आणि ते बघणाऱ्यांनाही त्यात काही चुकीचं वाटत नाही, पण अशा व्हिडीओजमधल्या एका घटकाबद्दल अमेरिकेतील एक १८ वर्षांचा मुलगा आवाज उठवतो आहे. त्याचं नाव आहे ख्रिस मॅकार्ती. तो युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमध्ये शिकतो आहे.
त्याचं म्हणणं असं आहे की अनेक पालक त्यांच्या मुलांचे व्हिडीओज बनवून यू-ट्यूबवर टाकतात आणि त्यातून पैसे कमावतात. पण यामध्ये त्या मुलाचा खासगीपणा संपून जातो याची कोणालाही फिकीर वाटत नाही. अनेक वेळा पालक अतिशय कौतुकानं आपल्या मुलांचे व्हिडिओ बनवतात. ते सोशल मीडियावर टाकतात. बऱ्याचदा आपले परिचित, अपरिचित लोकही या फोटोंचं कौतुक करतात. हे फोटो इतरांबरोबर शेअर करतात, व्हायरल करतात, पण आपल्याच मुलांचे फोटो, व्हिडीओ आपण त्याला न विचारता व्हायरल करतो आहोत, आपली ही कृती नंतर आपल्याच मुलांना आवडेल का? याचा कोणताही विचार ते करीत नाहीत.
एखाद्या लहान बाळाचा फोटो बघायला गोंडस वाटत असेल, पण ते बाळ जेव्हा पंधरा सोळा वर्षांचा तरुण मुलगा होतं त्यावेळी त्याला त्याचा तो फोटो सोशल मीडियावर किंवा इंटरनेटवर कुठेही असलेला आवडेल का, हे कोणीही सांगू शकत नाही. अनेक वेळा पालक त्यांच्या व्हिडीओला जास्त व्ह्यूज मिळावेत यासाठी त्या मुलाच्या आयुष्यातील अनेक खासगी बाबी इंटरनेटवर टाकत असतात. यात त्या मुलाचे अनेक वैयक्तिक अनुभव असू शकतात. शाळेत कोणीतरी त्रास देतं, वाढत्या वयातील मुलांना त्या त्या वेळी काही अडचणी येतात किंवा एखाद्या मुलीला अमुक एक वयात स्वतःच्या दिसण्याबद्दल न्यूनगंड असू शकतो. असे अनेक प्रसंग जवळजवळ सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी येतातच. मात्र माणसाचं वय वाढतं तसं या घटना मागे पडतात. त्यात झालेला त्रासही विस्मृतीत जातो. मात्र इंटरनेटवर टाकलेली कुठलीही गोष्ट आयुष्यभर तुमचा पिच्छा पुरवते. अशा वेळी एखाद्या अज्ञान मुलाच्या आईवडिलांनी त्या मुलाबद्दलची माहिती किंवा अनुभव सोशल मीडियावर टाकून त्यातून व्ह्यूज, पैसे कमावणं किती योग्य आहे? असा प्रश्न ख्रिस मॅकार्ती विचारतो.
त्याचं म्हणणं असं आहे की पालकांनी जर त्यांच्या मुलाला घेऊन व्हिडीओ बनवले आणि त्यातून पैसे कमावले तर त्यातील काही भाग हा त्या मुलाच्या नावाने त्यांनी बाजूला ठेवला पाहिजे. इतकंच नाही, तर पुढे जाऊन त्या मुलाला सज्ञान झाल्यावर जर असं वाटलं की त्याचं लहानपणीचं इंटरनेटवरचं अस्तित्व पुसून टाकायचं आहे, तर तसंही करण्याची सोय असली पाहिजे.
खासगीपणाच्या हक्कासाठी लढा !एकीकडे तरुण मंडळी सोशल मीडिया स्टार होण्यासाठी प्रयत्नशील असताना हा नुकताच सज्ञान झालेला ख्रिस अज्ञान बालकांच्या खासगीपणाच्या हक्कासाठी लढतो आहे, त्यांचा खासगीपणा जपण्यासाठी अमेरिकेच्या प्रत्येक राज्यात कायदा व्हावा म्हणून प्रयत्न करतो आहे. भले तुम्ही आमचे आई-बाप असाल, पण आमचा खासगीपणा जगजाहीर करण्याचा अधिकार तुम्हालाही नाही, असं तो त्यांना प्रेमानंबजावतो आहे.