देशातील संसद भवन हे एक ऐतिहासिक स्थळ असण्यासोबतच देशातील आलिशान भवनांपैकी एक आहे. संसद भवन १९२७ मध्ये उभारण्यात आलं होतं. ९३ वर्ष जुनी संसद भवनाची इमारत आजही भारतीय वास्तुकलेचा सुंदर नमूना आहे. दिल्लीच्या रायसीना भागात असलेली संसद भवनाची इमारत बघण्यासाठी केवळ देशातीलच नाही तर परदेशी पर्यटकही येतात.
संसद भवना कामाची सुरूवात १२ फेब्रुवारी १९२१मध्ये 'ड्यूक ऑफ कनाट' यांनी केली होती. याचा नकाशा दोन प्रसिद्ध तत्कालीन आर्किटेक्ट्स सर एडविन लुटियंस आणि सर हर्बर्ट बेकर यांनी तयार केला होता. तर ही इमारत तयार व्हायला सहा वर्षांचा कालावधी लागला होता. याचं उद्घाटन तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड इर्विन यांनी १८ जानेवारी १९२७ ला केलं होतं.
येथील अनेक गोष्टी बघण्यासारख्या आहेत. पण जास्तीत जास्त लोकांना हा प्रश्न पडतो की, संसद भवनातील पंखे हे जमिनीकडून छताच्या दिशेने का आहेत? कारण साधारणपणे घरातील पंखे छताकडून जमिनीच्या दिशेने असतात. पण संसदेतील पंखे उलटे लावले आहेत.
जर तुम्ही संसदेतील सेंट्रल हॉलचा व्हिडीओ किंवा फोटो पाहिला असेल तर त्यात तुम्ही तेथील पंखे उलटे दिसले असतील. येथील सगळेच पंखे छताऐवजी जमिनीवर खांबाच्या आधारे लावण्यात आले आहेत. आता तुम्ही म्हणाल की, असं का? तर याला कारण आहे या हॉलचं आर्किटेक्चर...
इतिहासकार असं मानतात की, जेव्हा संसद भवन उभारण्यात आलं होतं तेव्हा याच्या गोलाकार छतालाच याची ओळख मानलं जात होतं. हे गोलाकार छत फार उंचीवर बांधण्यात आलं होतं. हे छत उंचीवर असल्याने त्यावर पंखे लावले जाऊ शकत नव्हते. लांब रॉडला पंखे लटकवले असते तर हॉलचं सौंदर्य कमी झालं असतं. त्यामुळे पंखे खांबांच्या मदतीने जमिनीवर लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुळात संसद भवनाचं निर्माण एका मंदिराच्या आधारावर करण्यात आलं होतं. याचं नाव चौसठ योगिनी मंदिर होतं. भारतात एकूण ४ चौसठ योगिनी मंदिरे आहेत. त्यातील २ मध्यप्रदेश आणि २ ओडिशामध्ये आहेत. मध्यप्रदेशातील मंदिर सर्वात प्राचीन आणि मुख्य मंदिर मानलं जातं. यात ६४ खोल्या आहेत. प्रत्येक खोलीत एक शिवलिंग आहे. या मंदिरात पोहोचण्यासाठी २०० पायऱ्या आहेत.
(योगिनी मंदिर)
ब्रिटीश आर्किटेक्ट सर एडविन लुटियस आणि सर हर्बर्ट बेकर यांनी या मंदिरांना आधार मानून भारताच्या संसद भवनाचं निर्माण करण्यात आलं होतं. या मंदिराप्रमाणेच संसद भवन १४४ खांबांवर टिकलेलं आहे. या स्तंभांची उंची २७ फूट आहे. तर सहा एकर परिसरात संसद भवन उभारलं आहे. संसद भवनाला एकूण १२ द्वार आहेत, त्यातील एक मुख्य द्वार आहे.
तज्ज्ञ सांगतात की, संसद भवनातील पंखे सुरूवातीपासूनच अशाप्रकारे उलटे लावण्यात आले आहेत. संसद भवनाचं ऐतिहासिक महत्व कायम ठेवण्यासाठी यासोबत कुणीही छेडछाड केली नाही. त्यामुळे ते आजही तसेच आहेत.